शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग २

२०१३ चे वर्ष असेल. माझ्या उजव्या पायाची हिप रिप्लेसमेंट सर्जरी झाली होती. आत मांडीत बसून कोणीतरी हातोडीने छिन्नीवर घाव घालत आहे इतका दणका जाणवत होता. माश्या सारखा तडफडत होतो. स्पाईनमध्ये लावलेल्या पेन किलर मशीनचा साधा टू टू आवाजही मोठ्या भोंग्या सारखा वाटत होता. डोळ्यावर भूल अजूनही होती. सर्जरी मुळे गेल्या ३० तासापासून पाण्याचा साधा थेंबही नव्हता दिला. आणि अजून ७ तास तरी पाणी मिळणार नव्हते. घसा कोरड्या विहिरीसारखा झाला होता. जणू काही माझ्या घश्यातचं दुष्काळ उतरला होता. वॉर्ड मधल्या घड्याळ्याची टिक टिक ऐकू येत होती. कधी दिवस उजाडतोय असे झाले होते. आणि हॉस्पिटलच्या भयाण शांततेत रात्री ३ वाजल्याच्या सुमारास जोरात आवाज झाला, "ओ गॉड प्लिज हेल्प मी प्लिज हेल्प मी". अचानक आलेल्या आवाजाने सगळे दचकून जागे झाले. मी इतका दचकलो की भूल असलेल्या अवस्थेतही जोरात शिवी दिली. बाजूला वडील बसले होते. मी दिलेली शिवी ऐकूनही ते काही बोलले नाही. माझी वेदना - दुःख बापाने पोराच्या तरुण वयात अनुभवले होते. अनुभवत होते. अजून किती काळ अनुभवणार आहेत याची कल्पना नाही. कधी कधी वाटते गेल्या ८ वर्षांपासून बाप माझं डोंगरा एवढं दुःख पोटात घेऊन जगतोय, पण त्याला त्याचं ओझं कसं होतं नाही.? पण हे बाप झाल्या शिवाय कळत नाही हे ही तितकेच खरे आहे.

सकाळ झाली. ६ वाजताच सिस्टर स्पंजिंग करण्यासाठी माझ्या बेडजवळ आली. पण मी काही स्पंजिंग करायला तयार होतं नव्हतो. मांडीतला माणूस कालच्या रात्री पेक्षा अजून ताकदीने छिन्नीवर हातोडा मारत असल्या सारखा वाटतं होता. सिस्टर ऐकायला तयार नव्हती. माझ्या बेडवर सर्जरीची जखम ओली असल्याने ओझिंग झाले होते. पांढरी चादर लाल झाली होती. हो नाही म्हणता म्हणता शेवटी स्पंजिंग करून माझ्या बेडवर नवी चादर वैगरे टाकली गेली. मी तेव्हाही हळू हळू शिव्या देत होतो. शिवी दिल्याने वेदना सहन करण्याचं आत्मिक बळ मिळत असावं असा मीच माझा समज करून घेतला होता. आज या गोष्टींचे वाईट वाटते. पण काल रात्री मी दिलेली शिवी ही कोणाला तरी दुखावून गेली असणार हे माझ्या लक्षात आले. सकाळी ७.३० च्या दरम्यान एक घोट पाणी दिले मला. वडील बाजूलाचं बसलेले होते. त्यांना विचारले मी, "रात्री कोण इतक्या जोरात ओरडले?". त्यांनी सांगितले खिडकी जवळचा पेशंट ओरडत होता.
रॉजर. रॉजर अंकल. खिडकी जवळच्या बेडवर असलेला पेशंट. रॉजर अंकलला ब्लड कॅन्सर होता. आणि कॅन्सरच्या केमो ट्रीटमेंटमुळे रॉजर अंकलला भयाण त्रास झाला होता रात्री. इतका त्रास झाला की रॉजर अंकल डायरेक्ट गॉडला हेल्पसाठी बोलावत होता.
कदाचित मी रात्री दिलेली शिवी रॉजर अंकलच्या बायकोने ऐकली असावी. रॉजर अंकलची बायको म्हणजे दिसायला अगदी किरण राव सारखी.आणि रॉजर अंकल एकदम हुबेहूब डॅनी सारखा. कोरापान - उंच - पिळदार मिश्या आणि डोक्यावर केमोमुळे एकही केस न उरलेला पहाडासारखा पण शरीराने खचलेला माणूस. खरतरं कॅन्सर मध्ये अर्धा माणूस हा त्या केमोच्या ट्रीटमेंटनेच खचला जातो.
सकाळचे ८ वाजले होते. रॉजर अंकलची बायको माझ्या बेडजवळ आली. मी डोळे बंद करून कण्हत पडलो होतो. आणि तिने आवाज दिला, "राहुल ! कैसा है बेटा?". ताडकन माझे डोळे उघडले. मी "ठीक हूँ" म्हणालो आणि तितक्यात रॉजर अंकलची बायको मला सॉरी म्हणाली. तिला जाणवले होते की अंकलच्या रात्रीच्या आवाजाने मला त्रास झाला होता. तिने मी दिलेली शिवीही ऐकली असावी. मला अपराध्या सारखे वाटले. अंकलला होतं असलेल्या त्रासामुळे अंकल चिडचिड करू लागले होते.
दोन दिवस लोटले. अंकलला होणारा त्याला अस्वस्थ करत होता. दिवस रात्र अंकल नुसता वैतागलेला असायचा. डॉक्टर- सिस्टर सगळ्यांवर राग काढायचा. कोणाचं काही ऐकायचा नाही. अंकलची बायको हे सगळं सहन करत होती बिचारी. मला तिच्याकडे पाहून खंगलेली किरण राव कशी दिसेल तर अगदी रॉजर अंकलच्या बायकोसारखी असे वाटतं राहायचे. तिचे होणारं हाल. जिवाची ओढाताण मला बघवत नव्हती. आणि एक दिवस मी रॉजर अंकलच्या बायकोला विचारले, "आंटी ! अंकल रातको सोना चाहीये. सोयेगा नही कुछ खायेगा नही तो वो थक जायेगा." आंटी बोलली की, अंकल हेकेखोर स्वभावाचा माणूस आहे. अति स्वाभिमानी आहे. तो आजपर्यंत त्याचंच खरं करत आलाय. कोणाचं ऐकायचं नाही हा त्याचा जणू काही जन्मजात गुण.
एकदिवस मी सहज बोलता बोलता विचारले,
" आंटी ! अंकल को क्या अच्छा लगता है?".
आंटी एका दमात म्हणाली,
"चिकन - वाईन और बॉब मार्ली".
हॉस्पिटल जैन असल्याने तिथे चिकन आणण्याचा पर्यायचं नव्हता. वाईन तर लांबची गोष्ट होती. मग अंकलच्या आवडीचा फक्त उरला होता तो बॉब मार्ली. पण तो कसा आणायचा हॉस्पिटलला?
रविवारचा दिवस होता. मोबाईलवर टाईमपास करत बसलो होतो. कानात हेडफोन लावून गाणी ऐकत असताना कोणते तरी इंग्लिश गाणे लागले आणि तितक्यात रॉजर अंकलला त्रास होऊ लागला. रॉजर अंकल जोर जोरात उलटी करत होता. बसल्या जागी त्याला धाप लागली होती. त्याची अवस्था मला बघवत नव्हती. पण मी रॉजर अंकलसाठी काही करूही शकत नव्हतो. काय करावे नेमके काही कळत नव्हते. जाता येता रॉजर अंकलची बायको माझ्याकडे केविलवाणे पाहत हसत होती. मला तिला बघून जास्त वाईट वाटायचे. पण काय करावे सुचत नव्हते. अश्यातचं एका मित्राला फोन लावला. त्याला म्हणालो, "बॉब मार्लीची शक्य तेवढी गाणी मला पाहिजेत लवकरात लवकर". शेवटी मित्र तो. बॉब मार्लीची गाणी पाहिजे म्हणालो तर "येडा झाला की काय?" बोलून माझी अक्कल काढली. मी पुन्हा त्यालाही शिवी देऊन म्हणालो की, पाहिजेच.
...मित्राला शिवी दिल्या शिवाय तो ऐकत नाही, हा मैत्रीतला वैश्विक नियम आहे. आणि रात्री ९ च्या सुमारास बॉब मार्लीची २० -२२ गाणी घेऊन मित्र हॉस्पिटलला पोहचला. ब्लू ठुथ ने सगळी माझ्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर करून घेतली. थोड्या वेळ टाईमपास करत मित्र निघून गेला.
सोमवारचा दिवस उजाडला. मी सकाळीच ८ वाजता मोबाईलवर बॉब मार्लीची गाणी स्पिकर ऑन करून लावली. बाजूला वडील बसलेच होते. आपल्या पोराला इतकं इंग्लिश समजते? या प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहत होते. मी ही आपला मला कळते असा आव आणून गाणी ऐकत होतो. आणि तितक्यात बॉब मार्लीच्या आवाजात एक आवाज मिसळला गेला. रॉजर अंकल जोर जोरात बॉब मार्लीची गाणी बोलू लागला. मी मारलेला तीर परफेक्ट लागला होता. रॉजर अंकलची बायको माझ्या बेडजवळ येऊन माझ्याकडे हसत पाहत उभी राहिली. तिच्या डोळ्यात वेगळाच आनंद होता. साधारण दीड तासाने सगळी गाणी संपली. रॉजर अंकल त्याच्या बेडवरून इतकंच म्हणाला, "thanks राहुल बॉस". साला मला तर मानसशास्त्राचा डॉक्टर झाल्याचा फील आला होता. बाजूला बसलेले वडीलही गालात हसले.
पुढे ८ - १० दिवस मग असेच सुरू झाले. आमच्या वॉर्डमध्ये सकाळी ब्रेकफास्टला - दुपारी लंचला -रात्री डिनरला बॉब मार्ली येऊ लागला. सुरुवातीला बाकीचे पेशंट वैतागायचे. पण नंतर नंतर त्यांनाही सवय झाली होतो. रॉजर अंकलच्या नादात आयुष्यात दूर दूर पर्यंत संबंध नसलेला बॉब मार्ली मी ऐकला होता. त्याचे वन लव गाणे मला जास्त आवडायचे.
रॉजर अंकल आता सावरला होता. विशेष म्हणजे शांत झाला होता. त्रास होऊ लागला की तो मला आवाज द्यायचा, "राहुल बॉस प्लिज प्ले बॉब". मी पण आपला लगेच yes अंकल म्हणून गाणे प्ले करायचो.
रॉजर अंकलची बायको आता खुश वाटतं होती. खरतरं तिच्यासाठी मीच बॉब मार्ली होतो. वॉर्ड मधले दिवस मस्त चालले होते. अंकलच्या ही अंगात ताकद आल्याने तो थोडा चालू फिरू लागला होता. माझ्या जवळ येऊन बसायचा. त्याचे अनुभव सांगायचा. त्याची आणि आंटीची लव्ह स्टोरी सांगायचा. हे सगळं सुरू असताना रॉजर अंकलच्या डिस्चार्जचा दिवस आला.
इतक्या दिवस हॉस्पिटलच्या कपड्यात असलेला डॅनी आता मस्त ली कूपरचे ब्लॅक टी शर्ट - आणि जिन्स घालून माझ्या बेडजवळ आला. बेडचा पडदा बंद होता. खरतरं मी तो मुद्दाम लावला होता. रॉजर अंकल बरोबर आज वॉर्ड मधून बॉब मार्लीलाही डिस्चार्ज मिळणार होता.
अंकलने हळूच पडदा खोलला. माझ्या जवळ आला. माझ्या डोक्यावर हात ठेवत अंकल एकच वाक्य म्हणाला, "गॉड को डेली तेरे वास्ते प्रे करुंगा. गॉड ब्लेस यु." म्हणत अंकलने माझ्या हातात एक डेरी मिल्कची कॅडबरी दिली. आंटीचे डोळे भरून आले होते. ती फक्त माझ्याकडे एकटक पाहत होती. आणि रॉजर अंकल घरी जायला निघाला. आंटीने माझ्या डोक्यावर हात ठेवला, तेव्हा मला खूप जोरात रडू वाटले. आंटी जाताना एकचं वाक्य म्हणाली ,"Thank you." आणि दोघेही वॉर्डच्या बाहेर पडले.
पुढे सहा महिन्याने रॉजर अंकलची बायको मला OPD मध्ये भेटली. पण रॉजर अंकल दिसत नव्हता. मी विचारले, "रॉजर अंकल?". आंटी, "तेरा अंकल गॉड के पास गया." मला ऐकून वाईट वाटले. माझ्यासाठी प्रे करायला रॉजर अंकल डायरेक्ट गॉडकडे गेला की काय असे मला वाटले. पुढे मी एकही शब्द बोलू शकलो नाही. आंटीने तिच्या पर्स मधून दोन इक्लेरचे चॉकलेट काढून माझ्या हातात ठेवत म्हणाली, "अंकल होता तो तुझे कॅडबरी देता." आणि तितक्यात आंटीला कोणीतरी आवाज दिला. ती मला बाय बोलून निघून गेली. आंटी पाठमोरी चालत जाताना मला एक गोष्ट जाणवली की, खरतरं रॉजर अंकलच्या घरातचं त्याचा बॉब मार्ली होता. फक्त तो अंकलला कधी ऐकता आला नसावा. किंवा त्याने ऐकला नसावा.
अंकलला डिस्चार्ज दिल्या नंतर आज पर्यंत मी कधीच पुन्हा बॉब मार्ली ऐकला नाही. पुढेही कधी ऐकेल याची शक्यता नाही. पण सारखं मनाला वाटतं राहते की, जेव्हा जेव्हा रॉजर अंकलची बायको डेरी मिल्क खात असेल तेव्हा तिला माझी आठवण येत असेल का?. पण मला नेहमी किरण राव टिव्हीत वैगरे दिसली की रॉजर अंकलच्या बायकोची आठवण येते.
पण एक मात्र खरं आहे. गॉड कडे गेलेला रॉजर अंकल, जाता जाता मला 'Music Therapy' चा एक अध्याय नकळतपणे शिकवून गेला होता. कदाचित रॉजर अंकल आणि मंगेश पाडगावकरांचीही जुनी ओळख असावी.
बाकी काही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी रॉजर अंकल येतोच. आपण त्याच्या सोयी नुसार बॉब मार्ली झाले तर आयुष्य संगीतमय होईल इतकेच यानिमित्ताने.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग १०

प्रांजल. वय वर्ष सात वैगरे असेल तिचे. अगदी नाजूक पोरं. भारता बाहेर आपल्या आई वडिलांसोबत राहणारी भारतीय मुलगी आणि तिची बहीण. म्हणजे एकंदरीत ए...