रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग ४

आठ वर्षाची असेल ती. मी ऍडमिट झालो तेव्हा माझ्या बाजूच्या बेडवर ती आधीच ऍडमिट होती. आमच्या दोघांच्या बेडमध्ये एक पडदा होता त्यामुळे, तिच्या बाजूने येणाऱ्या आवाजामुळे कळले होते की, लहान मुलगी आहे कोणीतरी.

सुरवातीचे चार - पाच दिवस मी माझ्या ट्रीटमेंट मध्ये गुंग होतो. कंबरे पासून काढण्यात आलेल्या पायाच्या डाव्या बाजूचे हाड वाढल्याने, सुतार काम करताना जसा रंधा मारतात तसे काहीसे करून त्याला सरळ केले होते. एखाद्या लाकडाला आकार देताना त्या लाकडाला - लाकडाच्या झाडाला किती वेदना होतं असेल असा काहीसा अतिशोयोक्ती विचार ही मनात आला होता. पण, जिना है तो घीसना है भाई ! आणि माझे घासून - तासून झाले होते. आत जखमेवर भयंकर आग होतं होती म्हणून जाडजूड ड्रेसिंग वरूनही मी थंड वाटण्यासाठी तोंडाने फुक मारत बसायचो दिवसभर. वेदनेत माणसाने आशावादी रहावे. लागलीच चुकून आत हवा तर तेवढाचं थंडावा आपला, इतकेच वाटतं राहायचे.
बाजूला छोटी होतीच ऍडमिट. मस्त दिवसभर शाळेतल्या पोएम बोलायची. तिच्या बार्बी डॉलसोबत गप्पा मारायची. माझाही पडद्याआडून दिवसभर टाईमपास होतं राहायचा.
एक दिवस सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास तीन - चार डॉक्टर छोटीच्या बेडजवळ आले. स्टराईल वैगरे विचारत होते. मास्क - अप्रोन - हँड ग्लोज ही घातले जात होते, असे मला पडद्याआडून येणाऱ्या आवाजावरून अंदाज येत होता. आणि तितक्यात एका डॉक्टरचा आवाज आला, "तू ब्रेव गर्ल है ना?". छोटी पण , "हो" म्हणाली. मी सगळं ऐकत होतो. नेमकं काय चालले आहे हे मला कळत नव्हते. आवाजावरून जी काही वातावरण निर्मिती झालेली जाणवत होती त्यावरून मला असे वाटत होते की, छोटीची कसली तरी सर्जरी करणार आहेत आता. पण सर्जरी असेल तर इथे कशी करणार वॉर्ड मध्ये? सगळ्यां समोर?. डोकं भंडावून गेले होते माझे. आणि पुन्हा एका डॉक्टरचा आवाज आला, "सॉरी बेबी थोडा दर्द होगा चेस्टपें." ( दुसऱ्या डॉक्टरचा आवाज : "इधर कट मार दे इजी हो जायेगा").
आणि डॉक्टरने कट मारताच छोटी अशी काय किंचाळली की, माझ्या आत छातीत इतक्या जोरात धडधड झाली की प्रति सेकंद ५० ठोके पडत आहेत की काय असे जाणवत होते. छोटीचा आवाज अजून गर्द होत होता. दगडाला पाझर फुटेल इतक्या आर्ततेने छोटी ओरडत होती. नाही. ओरडत नाही ती किंचाळतच होती. डॉक्टर "सॉरी सॉरी बेबी" म्हणत आपले काम करत होता. डॉक्टरला ती वेदना कळत असावी पण त्यांना दुसरा पर्याय नव्हता. अश्यावेळी डॉक्टर ना बाप असतो - ना आई असते - ना मित्र असतो - ना भाऊ वैगरे. तो फक्त आणि फक्त डॉक्टर असतो. आणि अश्यावेळी त्याने डॉक्टरच रहावे.
डॉक्टरचं काम झाले होते. त्याने सिस्टरला सांगितले, "अच्छेसे ड्रेसिंग करके ले." मला तर येणाऱ्या आवाजावरून काहीच कळत नव्हते. आधी कट - आता ड्रेसिंग नेमकं काय केलंय त्या बारीकश्या जिवासोबत काही काही काहीच कळत नव्हते. तेवढ्यात डॉक्टरला कोणाचा तरी फोन आला आणि डॉक्टर इतकेच म्हणाले, "इधर ही है. एक बच्चू को पोर्ट कर रहा था." आणि मला कळाले छोटीच्या चेस्टवर काहीतरी पोर्ट म्हणून केले आहे.
मोबाईल डेटा ऑन केला. गुगलवर सर्च केले 'chest port' आणि जे काही डोळ्यासमोर आले ते भयंकर होते. चेस्ट पोर्ट हा एकतर डायलिसिस साठी करतात नाहीतर केमोथेरपी साठी. पण या दोन आजारात ला कोणता या कोवळ्या जिवाला होऊ शकतो? हा विचाराने सुन्न पडलो. वय वर्ष जेमतेम ८ -९ असेल. त्यात किडनी आणि कॅन्सरच्या आजाराचा काय संबंध? काहीच कळायला मार्ग नव्हता. Chest port च्या नादात खूप काही वाचून काढले गुगल वर. सगळं सुन्न करणारे होते.
अश्याचं एका दिवशी छोटी ला मध्यरात्री भयंकर असा त्रास होऊ लागला. तिच्या आवाजावरून जाणवत होते की, तिच्या अंगाची भयाण अशी आग होतं असावी. सिस्टर आली. चेक केले तिला. आणि होईल कमी बोलून निघून गेली. पण चेस्ट पोर्ट आणि अंगाची आग याचा संदर्भ जोडता मला मात्र कळून चुकले होते की, छोटीला कॅन्सर होता.
हो. ब्लड कॅन्सर. शरीरात रक्त कसे तयार होते हे शिकण्याच्या वयात या अश्या कोवळ्या जिवांना रक्त काय काय शिकवत असते?. हे वय असते का कॅन्सर होण्या सारखे?. काय स्थितीत माणसाचं जगणं येऊन ठेपले आहे, याचा अंदाज या साऱ्यातून आपल्याला येत राहतो.
मला एकच प्रश्न खात होता. छोटीला पोर्ट टाकताना - केमो देताना जो काही त्रास होत होता - होत आहे अश्यावेळी ती मनात काय बोलत असेल स्वतः बरोबर? काय सुरू असेल तिच्या डोक्यात? काय सांगायचं असेल तिला?
अश्याच एका दिवशी तिने तिच्या आईकडे हट्ट धरला की, तिला ड्रॉईंग बुक आणि कलर पाहिजे. तिची आई म्हणाली, "तुझे छोडकर कैसे जाऊ? पापा आयेगे saturday तब उन्हे बोलती हूँ लाने". तिच्या आईच्या बोलण्या वरून अंदाज आला की हे मुंबई बाहेरचे आहेत. तिच्या आईने बोललेले वाक्य माझ्या आईने ऐकले होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझी आई मला भेटायला आली तेव्हा तीन ड्रॉईंग बुक आणि दोन कलर बॉक्स घेऊनच आली.
आईने छोटीचा पडदा खोलत तिला विचारले, "ड्रॉईंग बनायेगी?". ती हो म्हणताच आईने तिच्या समोर ड्रॉईंग बुक आणि कलर ठेवले. ते पाहताचं ती खूष झाली. तिच्या आईला थोडे अवघडल्या सारखे वाटले. माझ्या आईने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटले, "बाजू के बेड में मेराभी बेटा है." आणि पडदा लावून पुन्हा माझ्या कडे आली.
आता छोटी च्या बेडकडून येणारा आवाज कमालीचा सकारात्मक होता. तिने पहिलेच चित्र रंगवायला घेतले होते ते फुलपाखराचे होते. रोज तीन चित्र रंगवायची ती. ड्रॉईंग बुक संपली की आई आणून द्यायची. आईलाही त्यात आनंद आणि समाधान वाटायचे. एक दिवस छोटी चे वडील आईला पैसे द्यायला लागले तर आई म्हणाली, "अरे नही ! मेरे बेटे जैसी तो है बस थोडी छोटी है." त्यानेही हसत जाणले आईला.
नंतर मी कधी कधी पडदा खोलून छोटीसोबत गप्पा मारायचो. तिने रंगवलेली चित्र दाखवायची ती. माणसाचं तोंड काढून त्याला चष्मा काढून माझं चित्र काढायची, ज्याला कान - नाक - ओठ काही नसायचे पण जे काही असायचे रंगीत असायचे अगदी.
एकदिवस छोटीने डोंगराला हिरवा रंग दिला. तिची आई म्हणाली, "ग्रीन थोडी होते है पहाड?". छोटी म्हणायची, ".ग्रीन ही होते है". माझी आई - सिस्टर सगळे म्हणाले , ग्रीन नही होता है पहाड. मग छोटीने मला विचारले. मी म्हणालो, "अभी तो बारीश होकर गयी है इस लिए पहाड ग्रीन है". ऐकून छोटी खूष झाली. तिच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद होता. पण माझ्या डोक्यात ग्रीन पहाड फिरत होता.
आता मला डिस्चार्ज मिळणार होता. दीड महिना मस्त गेला होता छोटीच्या सहवासात. दुःख काय रे सगळ्यांना असते आपण त्यातून सुख शोधत राहायचे असते. जे यावेळी छोटी मध्ये मिळाले.
मी घरी येताना छोटीच्या वडिलांना एक रिक्वेस्ट केली की, जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हिला वाटल्यास ड्रॉईंगच्या क्लासला टाका पण प्लिज हिला 'ग्राफिक डिजाईन' शिकवा. मी काय बोलतोय त्याला कळत नव्हते. इतक्या लहान वयात ग्राफिक डिजाईन?. पण मी ठाम होतो, ८ वर्षाचा कोवळा जीव जर काल वास्तवास्त पडलेल्या पावसाला त्याच्या काल्पनिक डोंगरा सोबत जोडत असेल तर, ज्या दिवशी तिला कळेल की सूर्य फिरत असतो त्यादिवशी ती त्याला पृथ्वीवर आणेल.
माझे सांगणे त्याला कळावे इतकेच वाटत होते. कदाचित माझेही रंग माझ्या घरच्यांना लहानपणी कळाले असते तर आज मी कदाचित म्युजिशीअन असतो. असो !
मला डिस्चार्ज मिळाला. पुढे काही दिवसाने छोटी ही तिच्या घरी गेली असेल. कॅन्सर तर आता तिच्या सोबतच आहे. तिच्या आई वडिलांनी तिचे आयुष्य मोजण्यापेक्षा तिचे जगणे मोजावे.
कदाचित तिने आतापर्यंत सूर्य पृथ्वीवर आणला देखील असेल. कदाचित नसेल ही. कदाचित ती असेल - नसेल ही पण तिने काढलेला हिरवा डोंगर इथल्या वास्तववादी जगण्याचा खरा अर्थ होता.
दुःख प्रत्येकाला असते. पण दुःख जेव्हा येते तेव्हा त्याच्या कुशीत बारीकसे सुख असते. ते सुख आपल्याला शोधता आले पाहिजे. ज्यादिवशी ते शोधता येईल त्यादिवशी, आपल्या दुःखाचे डोंगर हिरवेगार होतील.
दीड महिन्यात छोटीने रंगातून जगणे शिकवले. आपण कपाळा वरच्या रंगात इतके अडकलोय की आपल्याला साधे आपल्यातही डोकावत नाही. आपण डोकवत राहिले पाहिजे. खोल खोल जितके जमेल तितक्या खोल डोकवत राहिले पाहिजे, आपल्यातली छोटी जपत डोकवत राहिले पाहिजे.
- राहुल सिद्धार्थ साळवे
वाशी, नवी मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग १०

प्रांजल. वय वर्ष सात वैगरे असेल तिचे. अगदी नाजूक पोरं. भारता बाहेर आपल्या आई वडिलांसोबत राहणारी भारतीय मुलगी आणि तिची बहीण. म्हणजे एकंदरीत ए...