शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग ५

कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका लहान खेडे गावातून आजी आपल्या सरकारांना घेऊन मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटल आली होती. सरकार? आजी तिच्या नवऱ्याला सरकार म्हणायची.

सरकार म्हणजे, हे सहा फूट उंचीचा - भारदस्त शरीर असलेला आणि पिळदार मिश्या असलेला जुन्या तालमीतला पैलवान पठ्या. आणि आजीकडे पाहिले की थकलेली आशा काळे आठवायची. दोघांचे एकमेकांवर जिवाच्या पलीकडे प्रेम. आजोबाही आजीला अहो जावो करायचे. ऐकून भारी वाटायचे.
जीवाची मुंबई करत जगणारी माणसे पाहत आलोय आपण. पण आपल्या सरकारांचा जीव वाचवायला आजीने मुंबई गाठली होती.
बापाच्या वशील्यावर दोन्ही पोरांना सरकारी नोकरी लागली आणि पोरांना शिंग फुटली. आयुष्यभर बापाने हृदयासारखी जपलेली पोरं, बापाच्या बायपासच्या ऑपरेशनला साधी फिरकली ही नाही. पण आजी म्हणायची, "लेकरं मोठी झाली पण त्याबरोबर ती खोटी देखील झाली.
माझ्या बाजूच्या बेडवर आजोबा ऍडमिट होते. साधारण सत्तर च्या जवळपास असेल आजोबांचे वय. ह्रदयात ९०% ब्लॉकेज होते. त्यात शुगर - ब्लडप्रेशरचा त्रास होता. कोल्हापुरातल्या डॉक्टरांनी त्यांना बायपास करावे लागेल सांगितले होते. पण या वयात ऑपरेशन करणे धोक्याचे आहे हे ही सांगितले होते. पण सरकारांची आशा काळे मागे हटली नाही. तिने तिच्या सरकारांना घेऊन थेट मुंबई गाठली. आणि तीही अश्या डॉक्टरकडे की, ज्यांची अँपॉईंमेंट मिळण्यासाठी दोन दोन महिने वाट पहावी लागायची. मला प्रश्न पडला होता की, आजी स्वतः च्या जीवावर आजोबाला कशी काय इथपर्यंत घेऊन आली असेल.? म्हणून न राहवता एक दिवस आजीला विचारले मी, "आजी इतक्या मोठ्या हॉस्पिटलला घेऊन येताना भिती नाही वाटली का?. आजी हसत म्हणाली, "लेकरा जिवापेक्षा जमीन मोठी नसते. सरकार सोबत राहिले तर लय जमिनी कमवू." मला कळले होते आजीने जमीन विकून आजोबांना उपचारासाठी मुंबईत आणले होते.
पूर्ण हॉस्पिटल वातानुकूलित होते. आजोबांना हॉस्पिटल कडून ब्लॅंकेट दिले होते. आणि अजून लागले तरी त्यांना ते मिळायचे. पण आजी मात्र थंडीने काकडून जायची. माझ्या जीवाला हे सारं खातं राहायचं.
एक दिवस आईला सांगितले की, येताना आपल्या घरचे एक ब्लॅंकेट घेऊन ये. तिला काही कळले नाही. ती म्हणाली, "सिस्टरला माग ना देतील त्या". मी म्हणालो, "घेऊन तर ये".
दुसऱ्या दिवशी आई ब्लँकेट घेऊन हॉस्पिटलला आली. मी आजींना आवाज दिला. आणि ब्लॅंकेट देत त्यांना म्हणालो, "हे घ्या ! थंडीचं असं काकडून नका झोपत जाऊ". आजी होती ती. तिच्या सरकारांची. आधी नाही नाहीच म्हणाली. मी म्हणालो, "राहू द्या ठेवा. मुलगा समजून ठेवा." आजी ऐकताच एकच वाक्य म्हणाली, "तुझे माय बाप कधी म्हातारं नाय व्हायचे बघ." आजीच्या शब्दाने माझ्या अंगावर काटा आला. आईकडे बघत म्हणत म्हणालो, "ही काय माझी माय इथेच बसली आहे". आजीने आईकडे बघत तिच्या डोक्यावर हात ठेवत आजोबांच्या बेडकडे निघून गेली. त्या दिवसा नंतर आजीच्या दातांचा आवाज कधीच आला नाही. माझ्यासाठी तो थांबलेला आवाज म्हणजे आजीला दिलेली एक उब होती.
दोन दिवसा नंतर आजोबांच्या ऑपरेशनचा दिवस आला. दुपारी एक वाजता आजोबांची बायपास सर्जरी होणार होती. त्या रात्री आजी रात्रभर वॉर्ड मध्ये फेऱ्या मारत होती. साहजिक होते. तिच्या सरकारच्या ह्रदयाला हात घातला जाणार होता. कदाचित तिच्या मनात, तिच्या सरकारांचे ह्रदय खोलता आपली नालायक पोरं न दिसावी असं काहीसे असेल का? असे मला वाटतं होते. त्या रात्री मला सौमित्रची बायपास नावाची कविता नव्याने भेटली होती.
सकाळ होताच आजोबांच्या ऑपरेशनची तयारी सुरू झाली. सिस्टरची लगबग चालू होती. बार्बर मित्रांनी आजोबांची पूर्ण शरीराची शेविंग ही करून घेतली होती. आजोबांच्या हातात खंडोबाचा एक धागा बांधलेला होता. सिस्टर म्हणाली तो काढावा लागेल. पण आजोबा म्हणाले ,"नाय काढता यायचा. माझा देव हाय तो." खूप विनवणी केली तरी आजोबा ऐकायला तयार नव्हते. शेवटी मी आजोबांना म्हणालो, "बाबा ! तो धागा काढून आजीकडे द्या. ऑपरेशन झाले की पुन्हा घाला". पण आजोबा काही ऐकायला तयार नव्हते. काय करावे कोणालाच कळत नव्हते. आणि शेवटी मी माझी साहित्यिक भाषा वैगरे कामी येते की नाही हे पाहायला पुन्हा आजोबांना म्हणालो, "बाबा ! एक म्हाळसा आपल्या खंडोबाला कोल्हापूर वरून घेऊन आली आहे. आणि तिचा देव कोण कसा चोरेल?". आजोबाच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी सांगितले, "काढा धागा पण माझ्या यांच्या कडे द्या."
सात तासाच्या सर्जरी नंतर आजोबांना ICU वॉर्ड मध्ये शिफ्ट केले. माझी आणि आजी आजोबांची भेट होणार नव्हती आता. पण मनात एकचं विचार होता, "माझी घोंगडी पांघरणार्या म्हाळसेचा खंडोबा सुखरूप रहावा".
पुढे पाच दिवस गेले. माझेही रक्तातले क्रियेटिन हळू हळू कमी होतं होते. आणि एकदिवस हेड सिस्टर आली आणि म्हणाली, "राहुल तेरे बाजू में वो अंकल थे ना उनको अभी जनरल वॉर्ड में शिफ्ट करना है. वो फिरसे तेरे बाजू में ही आने के लिए बोल रहे है. लेकीन इस वॉर्ड में बेड नही है. मम्मी को बोलके उनसे बात करने बोल." मला तर आधी काही कळले नाही. आजोबा माझ्या बाजूलाच परत यायचे म्हणून अडून बसले होते. आईने ही आजीला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. काय करावे हा प्रश्न असताना माझ्या समोरच्या बेडवर एक मुलगा ऍडमिट होता. २५ वर्षाचा असेल. मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी आला होता. त्याचे वडील हे सगळं पाहत - ऐकत होते. आणि त्यांनी सिस्टरला जाऊन सांगितले की, आजोबांना त्यांच्या मुलाच्या बेडवर शिफ्ट करा आणि त्यांच्या मुलाला आजोबांच्या बेडवर. सिस्टर ने हे मला जेव्हा येऊन सांगितले तेव्हा मला माझे वडील आठवले. बाप बाप असतो. मी त्या मुलाच्या वडिलांना THANK YOU म्हणालो. ते फक्त हसले. पुढे काहीच म्हणाले नाही. पण मी मात्र मनात म्हणालो, "अंकल तुम्ही कधी म्हातारे होणार नाही."
पुढे एक तासात सगळी बेडची आदला बदल झाली. आणि माझ्या समोरच्या बेडवर आजोबा शिफ्ट झाले. आजोबा शिफ्ट होताच आजी माझ्या जवळ येऊन म्हणाली, "सरकारांना तुझ्या जवळच परत यायचे होते." आजोबांनी आजीचे ते शब्द ऐकले आणि म्हणाले, "सरकार नाय खंडोबा म्हण खंडोबा". आणि वॉर्ड मध्ये हशा पिकला.
पुढे आठ दिवस मला त्या आजी आजोबांचा सहवास लाभला. गावच्या गोष्टींनी दिवस मातीमय व्हायचा. आजोबांच्या पैलवानीच्या आठवणीने वॉर्डचा तालीम रंगायचा. मध्ये मध्ये त्यांच्या पोरांचा विषय निघाला की, आजोबा शिव्याच द्यायचे.
असच चालू असताना मला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे, हे आजीला कळले. तिने आजोबांना सांगितले. आजोबा इतकेच म्हणाले, "उद्या जाणार व्हय लेकरा घरी". मी हो म्हणालो. ते म्हणाले, "लक्षात ठेव आम्हासनी. कोल्हापुरात आलास तरी घरी ये. बोकड्याचा बेत करू". मी फक्त हसत होतो ऐकून. पण बोलताना आजोबांचा स्वर हळवा होत चालला होता. मी माझा मोबाईल नंबर एका कागदावर लिहून त्यांना दिला. म्हणालो घरी गेलात की फोन करा.
सकाळ झाली. माझ्या घरी जाण्याची तयारी सुरू होती. आणि स्टीवर्ड कॅनटिंग मधून मला चहा आणि एक मारी बिस्कीटचा पुडा घेऊन आला. मी म्हणालो, " " अरे मी नाही ऑर्डर केले काही. चुकून माझा बेड नंबर ऐकला असेल." आणि तितक्यात आजी म्हणाली, "आमच्यात लेकराला चहा नाय पाजत पण इथं तुला काही गोड धोड ही बनवून नाय देऊ शकत." मी सुन्न झालो. आजी आजोबांनी माझ्यासाठी सिस्टरला सांगून त्यांच्या बिलात पैसे ऍड करून मला चहा आणि बिस्कीट पाठवायला सांगितले होते.
तो चहा आणि बिस्कीट खात असताना माझा गळा दाटला होता. पण रडू शकणार नव्हतो. मी रडलो असतो तर आजी आजोबा रडले असते हे मला माहित होते. मला त्यांना रडवायचे नव्हते.
माझी घरी निघण्याची तयारी झाली. हॉस्पिटलचे कपडे बदलून मी घरचे कपडे घातले. व्हीलचेअर वर बसलो. आणि आजोबांकडे जाऊन त्यांना म्हणालो, "खंडोबा बाबा येतो". आजोबा खूप जोरात हसले. माझा हुंदका फुटण्या आधी मी वॉर्डच्या बाहेर पडलो. आजी माझ्या व्हीलचेअर च्या मागून मला सोडायला लिफ्ट पर्यंत आली होती. पण तिला मागे वळून पाहण्याची माझी हिंमत झाली नाही.आणि मी बघता बघता हॉस्पिटलच्या बाहेर पडलो.
दोन वर्षांचा काळ लोटला या साऱ्याला. आजी आजोबा आजही आठवतात. खंडोबाचा फोटो पाहण्यात जरी आला तरी मला आजोबा आठवतात. मी दिलेला मोबाईल नंबर कदाचित त्यांच्या कडून हरवला असेल. पण मी दिलेले ब्लॅंकेट घेऊन आजही आजी सुखाने झोपत असेल असे वाटत राहते.
किती साधी असतात ही मातीतली माणसे. आपणचं का इतका आव आणून जगत असतो? प्रत्येकाच्या हृदयात आपली आपली माणसे असतात. कदाचित ऑपरेशन आधी आजोबांनी डॉक्टरला सांगितले असेल का? की, "मला त्यांच्या ह्रदयात ठेवून मग टाके घालायला.?" सौमित्रची बायपास कविता या अश्या माणसांच्या हृदयातून जिवंत आहे. आणि पुढेही असेल.
आपण फक्त ज्याचा त्याचा खंडोबा ज्याला त्याला दाखवून दिला पाहिजे. बाकी मग सारे आयुष्यचं चांगभलं आहे. चांगभलं आहे.
- राहुल सिद्धार्थ साळवे
वाशी, नवी मुंबई

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग ४

आठ वर्षाची असेल ती. मी ऍडमिट झालो तेव्हा माझ्या बाजूच्या बेडवर ती आधीच ऍडमिट होती. आमच्या दोघांच्या बेडमध्ये एक पडदा होता त्यामुळे, तिच्या बाजूने येणाऱ्या आवाजामुळे कळले होते की, लहान मुलगी आहे कोणीतरी.

सुरवातीचे चार - पाच दिवस मी माझ्या ट्रीटमेंट मध्ये गुंग होतो. कंबरे पासून काढण्यात आलेल्या पायाच्या डाव्या बाजूचे हाड वाढल्याने, सुतार काम करताना जसा रंधा मारतात तसे काहीसे करून त्याला सरळ केले होते. एखाद्या लाकडाला आकार देताना त्या लाकडाला - लाकडाच्या झाडाला किती वेदना होतं असेल असा काहीसा अतिशोयोक्ती विचार ही मनात आला होता. पण, जिना है तो घीसना है भाई ! आणि माझे घासून - तासून झाले होते. आत जखमेवर भयंकर आग होतं होती म्हणून जाडजूड ड्रेसिंग वरूनही मी थंड वाटण्यासाठी तोंडाने फुक मारत बसायचो दिवसभर. वेदनेत माणसाने आशावादी रहावे. लागलीच चुकून आत हवा तर तेवढाचं थंडावा आपला, इतकेच वाटतं राहायचे.
बाजूला छोटी होतीच ऍडमिट. मस्त दिवसभर शाळेतल्या पोएम बोलायची. तिच्या बार्बी डॉलसोबत गप्पा मारायची. माझाही पडद्याआडून दिवसभर टाईमपास होतं राहायचा.
एक दिवस सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास तीन - चार डॉक्टर छोटीच्या बेडजवळ आले. स्टराईल वैगरे विचारत होते. मास्क - अप्रोन - हँड ग्लोज ही घातले जात होते, असे मला पडद्याआडून येणाऱ्या आवाजावरून अंदाज येत होता. आणि तितक्यात एका डॉक्टरचा आवाज आला, "तू ब्रेव गर्ल है ना?". छोटी पण , "हो" म्हणाली. मी सगळं ऐकत होतो. नेमकं काय चालले आहे हे मला कळत नव्हते. आवाजावरून जी काही वातावरण निर्मिती झालेली जाणवत होती त्यावरून मला असे वाटत होते की, छोटीची कसली तरी सर्जरी करणार आहेत आता. पण सर्जरी असेल तर इथे कशी करणार वॉर्ड मध्ये? सगळ्यां समोर?. डोकं भंडावून गेले होते माझे. आणि पुन्हा एका डॉक्टरचा आवाज आला, "सॉरी बेबी थोडा दर्द होगा चेस्टपें." ( दुसऱ्या डॉक्टरचा आवाज : "इधर कट मार दे इजी हो जायेगा").
आणि डॉक्टरने कट मारताच छोटी अशी काय किंचाळली की, माझ्या आत छातीत इतक्या जोरात धडधड झाली की प्रति सेकंद ५० ठोके पडत आहेत की काय असे जाणवत होते. छोटीचा आवाज अजून गर्द होत होता. दगडाला पाझर फुटेल इतक्या आर्ततेने छोटी ओरडत होती. नाही. ओरडत नाही ती किंचाळतच होती. डॉक्टर "सॉरी सॉरी बेबी" म्हणत आपले काम करत होता. डॉक्टरला ती वेदना कळत असावी पण त्यांना दुसरा पर्याय नव्हता. अश्यावेळी डॉक्टर ना बाप असतो - ना आई असते - ना मित्र असतो - ना भाऊ वैगरे. तो फक्त आणि फक्त डॉक्टर असतो. आणि अश्यावेळी त्याने डॉक्टरच रहावे.
डॉक्टरचं काम झाले होते. त्याने सिस्टरला सांगितले, "अच्छेसे ड्रेसिंग करके ले." मला तर येणाऱ्या आवाजावरून काहीच कळत नव्हते. आधी कट - आता ड्रेसिंग नेमकं काय केलंय त्या बारीकश्या जिवासोबत काही काही काहीच कळत नव्हते. तेवढ्यात डॉक्टरला कोणाचा तरी फोन आला आणि डॉक्टर इतकेच म्हणाले, "इधर ही है. एक बच्चू को पोर्ट कर रहा था." आणि मला कळाले छोटीच्या चेस्टवर काहीतरी पोर्ट म्हणून केले आहे.
मोबाईल डेटा ऑन केला. गुगलवर सर्च केले 'chest port' आणि जे काही डोळ्यासमोर आले ते भयंकर होते. चेस्ट पोर्ट हा एकतर डायलिसिस साठी करतात नाहीतर केमोथेरपी साठी. पण या दोन आजारात ला कोणता या कोवळ्या जिवाला होऊ शकतो? हा विचाराने सुन्न पडलो. वय वर्ष जेमतेम ८ -९ असेल. त्यात किडनी आणि कॅन्सरच्या आजाराचा काय संबंध? काहीच कळायला मार्ग नव्हता. Chest port च्या नादात खूप काही वाचून काढले गुगल वर. सगळं सुन्न करणारे होते.
अश्याचं एका दिवशी छोटी ला मध्यरात्री भयंकर असा त्रास होऊ लागला. तिच्या आवाजावरून जाणवत होते की, तिच्या अंगाची भयाण अशी आग होतं असावी. सिस्टर आली. चेक केले तिला. आणि होईल कमी बोलून निघून गेली. पण चेस्ट पोर्ट आणि अंगाची आग याचा संदर्भ जोडता मला मात्र कळून चुकले होते की, छोटीला कॅन्सर होता.
हो. ब्लड कॅन्सर. शरीरात रक्त कसे तयार होते हे शिकण्याच्या वयात या अश्या कोवळ्या जिवांना रक्त काय काय शिकवत असते?. हे वय असते का कॅन्सर होण्या सारखे?. काय स्थितीत माणसाचं जगणं येऊन ठेपले आहे, याचा अंदाज या साऱ्यातून आपल्याला येत राहतो.
मला एकच प्रश्न खात होता. छोटीला पोर्ट टाकताना - केमो देताना जो काही त्रास होत होता - होत आहे अश्यावेळी ती मनात काय बोलत असेल स्वतः बरोबर? काय सुरू असेल तिच्या डोक्यात? काय सांगायचं असेल तिला?
अश्याच एका दिवशी तिने तिच्या आईकडे हट्ट धरला की, तिला ड्रॉईंग बुक आणि कलर पाहिजे. तिची आई म्हणाली, "तुझे छोडकर कैसे जाऊ? पापा आयेगे saturday तब उन्हे बोलती हूँ लाने". तिच्या आईच्या बोलण्या वरून अंदाज आला की हे मुंबई बाहेरचे आहेत. तिच्या आईने बोललेले वाक्य माझ्या आईने ऐकले होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझी आई मला भेटायला आली तेव्हा तीन ड्रॉईंग बुक आणि दोन कलर बॉक्स घेऊनच आली.
आईने छोटीचा पडदा खोलत तिला विचारले, "ड्रॉईंग बनायेगी?". ती हो म्हणताच आईने तिच्या समोर ड्रॉईंग बुक आणि कलर ठेवले. ते पाहताचं ती खूष झाली. तिच्या आईला थोडे अवघडल्या सारखे वाटले. माझ्या आईने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटले, "बाजू के बेड में मेराभी बेटा है." आणि पडदा लावून पुन्हा माझ्या कडे आली.
आता छोटी च्या बेडकडून येणारा आवाज कमालीचा सकारात्मक होता. तिने पहिलेच चित्र रंगवायला घेतले होते ते फुलपाखराचे होते. रोज तीन चित्र रंगवायची ती. ड्रॉईंग बुक संपली की आई आणून द्यायची. आईलाही त्यात आनंद आणि समाधान वाटायचे. एक दिवस छोटी चे वडील आईला पैसे द्यायला लागले तर आई म्हणाली, "अरे नही ! मेरे बेटे जैसी तो है बस थोडी छोटी है." त्यानेही हसत जाणले आईला.
नंतर मी कधी कधी पडदा खोलून छोटीसोबत गप्पा मारायचो. तिने रंगवलेली चित्र दाखवायची ती. माणसाचं तोंड काढून त्याला चष्मा काढून माझं चित्र काढायची, ज्याला कान - नाक - ओठ काही नसायचे पण जे काही असायचे रंगीत असायचे अगदी.
एकदिवस छोटीने डोंगराला हिरवा रंग दिला. तिची आई म्हणाली, "ग्रीन थोडी होते है पहाड?". छोटी म्हणायची, ".ग्रीन ही होते है". माझी आई - सिस्टर सगळे म्हणाले , ग्रीन नही होता है पहाड. मग छोटीने मला विचारले. मी म्हणालो, "अभी तो बारीश होकर गयी है इस लिए पहाड ग्रीन है". ऐकून छोटी खूष झाली. तिच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद होता. पण माझ्या डोक्यात ग्रीन पहाड फिरत होता.
आता मला डिस्चार्ज मिळणार होता. दीड महिना मस्त गेला होता छोटीच्या सहवासात. दुःख काय रे सगळ्यांना असते आपण त्यातून सुख शोधत राहायचे असते. जे यावेळी छोटी मध्ये मिळाले.
मी घरी येताना छोटीच्या वडिलांना एक रिक्वेस्ट केली की, जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हिला वाटल्यास ड्रॉईंगच्या क्लासला टाका पण प्लिज हिला 'ग्राफिक डिजाईन' शिकवा. मी काय बोलतोय त्याला कळत नव्हते. इतक्या लहान वयात ग्राफिक डिजाईन?. पण मी ठाम होतो, ८ वर्षाचा कोवळा जीव जर काल वास्तवास्त पडलेल्या पावसाला त्याच्या काल्पनिक डोंगरा सोबत जोडत असेल तर, ज्या दिवशी तिला कळेल की सूर्य फिरत असतो त्यादिवशी ती त्याला पृथ्वीवर आणेल.
माझे सांगणे त्याला कळावे इतकेच वाटत होते. कदाचित माझेही रंग माझ्या घरच्यांना लहानपणी कळाले असते तर आज मी कदाचित म्युजिशीअन असतो. असो !
मला डिस्चार्ज मिळाला. पुढे काही दिवसाने छोटी ही तिच्या घरी गेली असेल. कॅन्सर तर आता तिच्या सोबतच आहे. तिच्या आई वडिलांनी तिचे आयुष्य मोजण्यापेक्षा तिचे जगणे मोजावे.
कदाचित तिने आतापर्यंत सूर्य पृथ्वीवर आणला देखील असेल. कदाचित नसेल ही. कदाचित ती असेल - नसेल ही पण तिने काढलेला हिरवा डोंगर इथल्या वास्तववादी जगण्याचा खरा अर्थ होता.
दुःख प्रत्येकाला असते. पण दुःख जेव्हा येते तेव्हा त्याच्या कुशीत बारीकसे सुख असते. ते सुख आपल्याला शोधता आले पाहिजे. ज्यादिवशी ते शोधता येईल त्यादिवशी, आपल्या दुःखाचे डोंगर हिरवेगार होतील.
दीड महिन्यात छोटीने रंगातून जगणे शिकवले. आपण कपाळा वरच्या रंगात इतके अडकलोय की आपल्याला साधे आपल्यातही डोकावत नाही. आपण डोकवत राहिले पाहिजे. खोल खोल जितके जमेल तितक्या खोल डोकवत राहिले पाहिजे, आपल्यातली छोटी जपत डोकवत राहिले पाहिजे.
- राहुल सिद्धार्थ साळवे
वाशी, नवी मुंबई

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग ३

माझ्या लंग्सला इन्फेक्शन झाले होते. दोनचं दिवसापूर्वी पाठीतून एक हजार मिली लिटर पाणी काढले गेले होते. भर उन्हाळ्यात मी पाठीत पाणी घेऊन बसलो असल्याने डॉक्टर चेष्टेत म्हणाले होते, "लोगो को पीने के लिए पाणी नही महाराष्ट्र में और तू लंग्स में पाणी छुपाकर बैठा है." डॉक्टरांनी पुढे ते पाणी मुक्त केले. पण माझ्या सारखे अनेक भामटे खिश्यात पाणी लपवून बसले आहेत, कोणी तरी त्यांच्या खिश्यात पाईप टाकून पाणी मुक्त करणाऱ्या सामाजिक डॉक्टरची गरज आहे सध्या महाराष्ट्राला. असो.

दिवाळीचा काळ होता. म्हणून हॉस्पिटलमध्ये जास्तकाही गर्दी नव्हती. बरेच बेड रिकामे होते. पण माझ्या सारखे ज्यांच्या आयुष्यालाचं कंदील लागलाय असे काही जण होते ऍडमिट. मला आठवतं आहे त्यानुसार दिवाळी चा पहिला दिवस वैगरे असेल आणि दुपारी ३ च्या सुमारास माझ्या समोरच्या बेडवर एक १९ वर्षाचा तरुण मुलगा ऍडमिट झाला. युरिन इन्फेक्शन मुळे त्याचे ब्लॅडर ब्लॉक झाले होते. पोट टम्म फुगले होते. मला कल्पना होती आता डॉक्टर येणार त्याच्या युरिनच्या जागेतून कॅथेटर टाकणार. आणि हा जिवाच्या आकांताने जोर जोरात ओरडणार. पुढे एका तासात तसेच घडले.
कॅथेटर टाकताना काय करंट लागतो हे मला खूप चांगले माहीत होते. सहा वर्ष मी युरिन कॅथेटर सोबत काढली आहेत. तीही दर पंधरा दिवसाने बद्दलण्याच्या दर्दनाक प्रोसेसवर. त्यामुळे त्या १९ वर्षाच्या दोस्ताची अवस्था मला कळत होती. त्यात काही तासाने मला कळाले की, तो गतिमंद आहे. मेंदूची वाढ पूर्ण न झाल्याने त्याचा त्याच्या मेंदूवर - शरीरावर कंट्रोल नाही.
दोन दिवस गेले. समोरच्या बेडवर असलेल्या दोस्ताला कॅथेटरचा वैताग आला होता. तो ते ओढायचा पण सहज निघेल ते कॅथेटर कसले? निघायचे तर नाही पण ओढल्याने त्याला भयंकर त्रास व्हायचा. त्याच्या सोबत त्याची आई आणि बहीण असायची २४ तास. तो त्यांच्याशी भारी गप्पा मारायचा. छोटा भीमला सांग चुटकीला त्रास देऊ नको - शिंच्यान शाळेत गेलेला का काल - अभिजितचे डॉक्टर तारीका सोबत लग्न व्हायला पाहिजे - टप्पू सेना येणार आहे मला हॉस्पिटल ला भेटायला. अश्या टीव्ही वरच्या गप्पा मारायचा तो आई आणि बहिणी सोबत. त्याही त्याचे उत्तर द्यायच्या. शिंच्यानला आज शाळेत शिक्षा झाली - टप्पू तुला भेटायला येणार आहे असे वैगरे वैगरे. त्या सगळ्या संवादातून मला अंदाज आला होता की, या माय-लेकीसाठी हा रोजचा टास्क आहे म्हणून.
माझी आई त्याला जाता येता विचारायची, जेवलास का? काय करतोय आहेस? किंवा मला भेटून घरी जाताना त्याला भेटून बाय बोलून जायची. त्यामुळे त्याची आणि आईची मस्त मैत्री जमली होती.
एका रात्री या दोस्ताला जबरदस्त फिट आली. सगळ्यांची धावपळ सूरु झाली. इंजेक्शन - सलाईन वैगरेचा मारा सुरू झाला त्याच्यावर. खूप प्रयत्ना नंतर जवळपास तासाभराने तो शांत झाला.
एक दिवस त्याने आईला विचारले, "तुम्ही कुठे येता?". आईने माझ्या बेडचा पडदा खोलून सांगितले, "याला भेटायला." पठ्याने मला पाहताच बोलला, "हा तर दया आहे CID मधला." मला हसायला आले. त्याची आई बहीणही हसायला लागले. आई म्हणाली, "हो दया आहे तू ओळखतोस का याला?". तो म्हणाला ,"हो ओळखतो. याला गोळी लागली आहे का?. आई पण माझी फिल्मी ती ही सुरू झाली, "हो चोराला पकडताना याला गोळी लागली आहे." हे ऐकून त्याला दुःख झाले. अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी आले. माणसं एखाद्या कलाकारावर किती प्रेम करतात याचा प्रत्यय आला होता. त्याची आई म्हणाली, "याला खूप वेड आहे CID मालिकेचे."
मग पठ्या रोज माझ्याशी बोलू लागला. त्याला जे जे काल्पनिक दिसायचे ते माझ्या सोबत खेळू लागला. "दया सर ! हिरा पुरानी हवेली जवळ आला आहे तुम्ही लवकर जा, मला आताच अभिजित सरांचा फोन आला होता". मी पण हो बोलून पडदा लावून घ्यायचो आणि मोबाईल मध्ये Gun fire चा रेकॉर्ड केलेला voice प्ले करायचो. मग आख्या वॉर्ड मध्ये पुढचे दहा मिनिटं फक्त कधी रायफलच्या - कधी AK 47 च्या बुलेटचा आवाज यायचा. मग पडदा खोलून त्याला बोलायचो, 'THANK YOU समीर. तुझ्यामुळे हिराला मारता आले." तो म्हणायचा, "ये मेरा फर्ज है."
पुढे ८ दिवस हेच सुरू होते. CID - गोळ्या - अभिजित किंवा प्रदूमनचा फोन - डॉ. साळुंखे वैगरे. सगळं खूप भारी वाटत होते. मी एक असा दिग्दर्शक पाहत होतो की तो त्याला पाहिजे असलेली गोष्ट रंगवत होता. ते ही मला आनंद देत.
निर्मितीचा नियमच आहे. कोणाला न फसवता आपण एखाद्याला आनंद देत आहात हे जेव्हा आपल्याला जाणवते तेव्हा आपण निर्मळ - स्वच्छ माणूस झालेलो असतो.
आता पठ्याला डिस्चार्ज मिळाला होता. जाताना मला bye बोलत सांगून गेला आहे, "टिव्हीत तुम्हाला आवाज देईल आणि सगळ्या चोरांना मारा." मी ही ,"हो म्हणालो." आता पठ्या निघून गेला.
एखादी कलाकृती आपल्याला इलाजासारखे उपचार करते याचं दर्शन हा तरुण दोस्त देउन गेला होता. आता मी ही कधी खूप त्रास जाणवायला लागला की मुन्नवर राणाच्या कविता जोर जोरात बोलतो. मला मीच मुन्नवर राणा झाल्याचा फील येतो.
एकदा मुन्नवर राणाच्या कविता जोर जोरात बोलून पहा. हुंदका दाटून येईल. मग घायमोकळून रडा. मोकळे वाटेल.
खरतरं ! आपल्यातल्या 'दयाला' मुन्नवर राणासारखी माणसे ताकद देत असतात, इतकं साधं आणि सोपं एक १९ वर्षाचा समीर सांगून गेला.
मी आता कधी तरी आरश्यात पाहिले की कळते, माझ्या जाडजूड शरीरयष्टी मध्ये समीरचा दया होता. आहे.
आपल्या आजूबाजूला असे अनेक समीर आहेत. आपण त्यांच्या आवडीनुसार कधी दया - कधी छोटा भीम - तर कधी एखाद्या राहुलसाठी मुन्नवर राणा व्हावे. आयुष्य याहून वेगळे काहीचं नाही.
शेवटी मुन्नवर राणा म्हणतातचं की,
मेरी ख़्वाहिश है कि फिर से मैं फ़रिश्ता हो जाऊँ
माँ से इस तरह लिपट जाऊं कि बच्चा हो जाऊँ
कम-से कम बच्चों के होठों की हंसी की ख़ातिर
ऎसी मिट्टी में मिलाना कि खिलौना हो जाऊँ
- राहुल सिद्धार्थ साळवे
वाशी, नवी मुंबई

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग २

२०१३ चे वर्ष असेल. माझ्या उजव्या पायाची हिप रिप्लेसमेंट सर्जरी झाली होती. आत मांडीत बसून कोणीतरी हातोडीने छिन्नीवर घाव घालत आहे इतका दणका जाणवत होता. माश्या सारखा तडफडत होतो. स्पाईनमध्ये लावलेल्या पेन किलर मशीनचा साधा टू टू आवाजही मोठ्या भोंग्या सारखा वाटत होता. डोळ्यावर भूल अजूनही होती. सर्जरी मुळे गेल्या ३० तासापासून पाण्याचा साधा थेंबही नव्हता दिला. आणि अजून ७ तास तरी पाणी मिळणार नव्हते. घसा कोरड्या विहिरीसारखा झाला होता. जणू काही माझ्या घश्यातचं दुष्काळ उतरला होता. वॉर्ड मधल्या घड्याळ्याची टिक टिक ऐकू येत होती. कधी दिवस उजाडतोय असे झाले होते. आणि हॉस्पिटलच्या भयाण शांततेत रात्री ३ वाजल्याच्या सुमारास जोरात आवाज झाला, "ओ गॉड प्लिज हेल्प मी प्लिज हेल्प मी". अचानक आलेल्या आवाजाने सगळे दचकून जागे झाले. मी इतका दचकलो की भूल असलेल्या अवस्थेतही जोरात शिवी दिली. बाजूला वडील बसले होते. मी दिलेली शिवी ऐकूनही ते काही बोलले नाही. माझी वेदना - दुःख बापाने पोराच्या तरुण वयात अनुभवले होते. अनुभवत होते. अजून किती काळ अनुभवणार आहेत याची कल्पना नाही. कधी कधी वाटते गेल्या ८ वर्षांपासून बाप माझं डोंगरा एवढं दुःख पोटात घेऊन जगतोय, पण त्याला त्याचं ओझं कसं होतं नाही.? पण हे बाप झाल्या शिवाय कळत नाही हे ही तितकेच खरे आहे.

सकाळ झाली. ६ वाजताच सिस्टर स्पंजिंग करण्यासाठी माझ्या बेडजवळ आली. पण मी काही स्पंजिंग करायला तयार होतं नव्हतो. मांडीतला माणूस कालच्या रात्री पेक्षा अजून ताकदीने छिन्नीवर हातोडा मारत असल्या सारखा वाटतं होता. सिस्टर ऐकायला तयार नव्हती. माझ्या बेडवर सर्जरीची जखम ओली असल्याने ओझिंग झाले होते. पांढरी चादर लाल झाली होती. हो नाही म्हणता म्हणता शेवटी स्पंजिंग करून माझ्या बेडवर नवी चादर वैगरे टाकली गेली. मी तेव्हाही हळू हळू शिव्या देत होतो. शिवी दिल्याने वेदना सहन करण्याचं आत्मिक बळ मिळत असावं असा मीच माझा समज करून घेतला होता. आज या गोष्टींचे वाईट वाटते. पण काल रात्री मी दिलेली शिवी ही कोणाला तरी दुखावून गेली असणार हे माझ्या लक्षात आले. सकाळी ७.३० च्या दरम्यान एक घोट पाणी दिले मला. वडील बाजूलाचं बसलेले होते. त्यांना विचारले मी, "रात्री कोण इतक्या जोरात ओरडले?". त्यांनी सांगितले खिडकी जवळचा पेशंट ओरडत होता.
रॉजर. रॉजर अंकल. खिडकी जवळच्या बेडवर असलेला पेशंट. रॉजर अंकलला ब्लड कॅन्सर होता. आणि कॅन्सरच्या केमो ट्रीटमेंटमुळे रॉजर अंकलला भयाण त्रास झाला होता रात्री. इतका त्रास झाला की रॉजर अंकल डायरेक्ट गॉडला हेल्पसाठी बोलावत होता.
कदाचित मी रात्री दिलेली शिवी रॉजर अंकलच्या बायकोने ऐकली असावी. रॉजर अंकलची बायको म्हणजे दिसायला अगदी किरण राव सारखी.आणि रॉजर अंकल एकदम हुबेहूब डॅनी सारखा. कोरापान - उंच - पिळदार मिश्या आणि डोक्यावर केमोमुळे एकही केस न उरलेला पहाडासारखा पण शरीराने खचलेला माणूस. खरतरं कॅन्सर मध्ये अर्धा माणूस हा त्या केमोच्या ट्रीटमेंटनेच खचला जातो.
सकाळचे ८ वाजले होते. रॉजर अंकलची बायको माझ्या बेडजवळ आली. मी डोळे बंद करून कण्हत पडलो होतो. आणि तिने आवाज दिला, "राहुल ! कैसा है बेटा?". ताडकन माझे डोळे उघडले. मी "ठीक हूँ" म्हणालो आणि तितक्यात रॉजर अंकलची बायको मला सॉरी म्हणाली. तिला जाणवले होते की अंकलच्या रात्रीच्या आवाजाने मला त्रास झाला होता. तिने मी दिलेली शिवीही ऐकली असावी. मला अपराध्या सारखे वाटले. अंकलला होतं असलेल्या त्रासामुळे अंकल चिडचिड करू लागले होते.
दोन दिवस लोटले. अंकलला होणारा त्याला अस्वस्थ करत होता. दिवस रात्र अंकल नुसता वैतागलेला असायचा. डॉक्टर- सिस्टर सगळ्यांवर राग काढायचा. कोणाचं काही ऐकायचा नाही. अंकलची बायको हे सगळं सहन करत होती बिचारी. मला तिच्याकडे पाहून खंगलेली किरण राव कशी दिसेल तर अगदी रॉजर अंकलच्या बायकोसारखी असे वाटतं राहायचे. तिचे होणारं हाल. जिवाची ओढाताण मला बघवत नव्हती. आणि एक दिवस मी रॉजर अंकलच्या बायकोला विचारले, "आंटी ! अंकल रातको सोना चाहीये. सोयेगा नही कुछ खायेगा नही तो वो थक जायेगा." आंटी बोलली की, अंकल हेकेखोर स्वभावाचा माणूस आहे. अति स्वाभिमानी आहे. तो आजपर्यंत त्याचंच खरं करत आलाय. कोणाचं ऐकायचं नाही हा त्याचा जणू काही जन्मजात गुण.
एकदिवस मी सहज बोलता बोलता विचारले,
" आंटी ! अंकल को क्या अच्छा लगता है?".
आंटी एका दमात म्हणाली,
"चिकन - वाईन और बॉब मार्ली".
हॉस्पिटल जैन असल्याने तिथे चिकन आणण्याचा पर्यायचं नव्हता. वाईन तर लांबची गोष्ट होती. मग अंकलच्या आवडीचा फक्त उरला होता तो बॉब मार्ली. पण तो कसा आणायचा हॉस्पिटलला?
रविवारचा दिवस होता. मोबाईलवर टाईमपास करत बसलो होतो. कानात हेडफोन लावून गाणी ऐकत असताना कोणते तरी इंग्लिश गाणे लागले आणि तितक्यात रॉजर अंकलला त्रास होऊ लागला. रॉजर अंकल जोर जोरात उलटी करत होता. बसल्या जागी त्याला धाप लागली होती. त्याची अवस्था मला बघवत नव्हती. पण मी रॉजर अंकलसाठी काही करूही शकत नव्हतो. काय करावे नेमके काही कळत नव्हते. जाता येता रॉजर अंकलची बायको माझ्याकडे केविलवाणे पाहत हसत होती. मला तिला बघून जास्त वाईट वाटायचे. पण काय करावे सुचत नव्हते. अश्यातचं एका मित्राला फोन लावला. त्याला म्हणालो, "बॉब मार्लीची शक्य तेवढी गाणी मला पाहिजेत लवकरात लवकर". शेवटी मित्र तो. बॉब मार्लीची गाणी पाहिजे म्हणालो तर "येडा झाला की काय?" बोलून माझी अक्कल काढली. मी पुन्हा त्यालाही शिवी देऊन म्हणालो की, पाहिजेच.
...मित्राला शिवी दिल्या शिवाय तो ऐकत नाही, हा मैत्रीतला वैश्विक नियम आहे. आणि रात्री ९ च्या सुमारास बॉब मार्लीची २० -२२ गाणी घेऊन मित्र हॉस्पिटलला पोहचला. ब्लू ठुथ ने सगळी माझ्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर करून घेतली. थोड्या वेळ टाईमपास करत मित्र निघून गेला.
सोमवारचा दिवस उजाडला. मी सकाळीच ८ वाजता मोबाईलवर बॉब मार्लीची गाणी स्पिकर ऑन करून लावली. बाजूला वडील बसलेच होते. आपल्या पोराला इतकं इंग्लिश समजते? या प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहत होते. मी ही आपला मला कळते असा आव आणून गाणी ऐकत होतो. आणि तितक्यात बॉब मार्लीच्या आवाजात एक आवाज मिसळला गेला. रॉजर अंकल जोर जोरात बॉब मार्लीची गाणी बोलू लागला. मी मारलेला तीर परफेक्ट लागला होता. रॉजर अंकलची बायको माझ्या बेडजवळ येऊन माझ्याकडे हसत पाहत उभी राहिली. तिच्या डोळ्यात वेगळाच आनंद होता. साधारण दीड तासाने सगळी गाणी संपली. रॉजर अंकल त्याच्या बेडवरून इतकंच म्हणाला, "thanks राहुल बॉस". साला मला तर मानसशास्त्राचा डॉक्टर झाल्याचा फील आला होता. बाजूला बसलेले वडीलही गालात हसले.
पुढे ८ - १० दिवस मग असेच सुरू झाले. आमच्या वॉर्डमध्ये सकाळी ब्रेकफास्टला - दुपारी लंचला -रात्री डिनरला बॉब मार्ली येऊ लागला. सुरुवातीला बाकीचे पेशंट वैतागायचे. पण नंतर नंतर त्यांनाही सवय झाली होतो. रॉजर अंकलच्या नादात आयुष्यात दूर दूर पर्यंत संबंध नसलेला बॉब मार्ली मी ऐकला होता. त्याचे वन लव गाणे मला जास्त आवडायचे.
रॉजर अंकल आता सावरला होता. विशेष म्हणजे शांत झाला होता. त्रास होऊ लागला की तो मला आवाज द्यायचा, "राहुल बॉस प्लिज प्ले बॉब". मी पण आपला लगेच yes अंकल म्हणून गाणे प्ले करायचो.
रॉजर अंकलची बायको आता खुश वाटतं होती. खरतरं तिच्यासाठी मीच बॉब मार्ली होतो. वॉर्ड मधले दिवस मस्त चालले होते. अंकलच्या ही अंगात ताकद आल्याने तो थोडा चालू फिरू लागला होता. माझ्या जवळ येऊन बसायचा. त्याचे अनुभव सांगायचा. त्याची आणि आंटीची लव्ह स्टोरी सांगायचा. हे सगळं सुरू असताना रॉजर अंकलच्या डिस्चार्जचा दिवस आला.
इतक्या दिवस हॉस्पिटलच्या कपड्यात असलेला डॅनी आता मस्त ली कूपरचे ब्लॅक टी शर्ट - आणि जिन्स घालून माझ्या बेडजवळ आला. बेडचा पडदा बंद होता. खरतरं मी तो मुद्दाम लावला होता. रॉजर अंकल बरोबर आज वॉर्ड मधून बॉब मार्लीलाही डिस्चार्ज मिळणार होता.
अंकलने हळूच पडदा खोलला. माझ्या जवळ आला. माझ्या डोक्यावर हात ठेवत अंकल एकच वाक्य म्हणाला, "गॉड को डेली तेरे वास्ते प्रे करुंगा. गॉड ब्लेस यु." म्हणत अंकलने माझ्या हातात एक डेरी मिल्कची कॅडबरी दिली. आंटीचे डोळे भरून आले होते. ती फक्त माझ्याकडे एकटक पाहत होती. आणि रॉजर अंकल घरी जायला निघाला. आंटीने माझ्या डोक्यावर हात ठेवला, तेव्हा मला खूप जोरात रडू वाटले. आंटी जाताना एकचं वाक्य म्हणाली ,"Thank you." आणि दोघेही वॉर्डच्या बाहेर पडले.
पुढे सहा महिन्याने रॉजर अंकलची बायको मला OPD मध्ये भेटली. पण रॉजर अंकल दिसत नव्हता. मी विचारले, "रॉजर अंकल?". आंटी, "तेरा अंकल गॉड के पास गया." मला ऐकून वाईट वाटले. माझ्यासाठी प्रे करायला रॉजर अंकल डायरेक्ट गॉडकडे गेला की काय असे मला वाटले. पुढे मी एकही शब्द बोलू शकलो नाही. आंटीने तिच्या पर्स मधून दोन इक्लेरचे चॉकलेट काढून माझ्या हातात ठेवत म्हणाली, "अंकल होता तो तुझे कॅडबरी देता." आणि तितक्यात आंटीला कोणीतरी आवाज दिला. ती मला बाय बोलून निघून गेली. आंटी पाठमोरी चालत जाताना मला एक गोष्ट जाणवली की, खरतरं रॉजर अंकलच्या घरातचं त्याचा बॉब मार्ली होता. फक्त तो अंकलला कधी ऐकता आला नसावा. किंवा त्याने ऐकला नसावा.
अंकलला डिस्चार्ज दिल्या नंतर आज पर्यंत मी कधीच पुन्हा बॉब मार्ली ऐकला नाही. पुढेही कधी ऐकेल याची शक्यता नाही. पण सारखं मनाला वाटतं राहते की, जेव्हा जेव्हा रॉजर अंकलची बायको डेरी मिल्क खात असेल तेव्हा तिला माझी आठवण येत असेल का?. पण मला नेहमी किरण राव टिव्हीत वैगरे दिसली की रॉजर अंकलच्या बायकोची आठवण येते.
पण एक मात्र खरं आहे. गॉड कडे गेलेला रॉजर अंकल, जाता जाता मला 'Music Therapy' चा एक अध्याय नकळतपणे शिकवून गेला होता. कदाचित रॉजर अंकल आणि मंगेश पाडगावकरांचीही जुनी ओळख असावी.
बाकी काही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी रॉजर अंकल येतोच. आपण त्याच्या सोयी नुसार बॉब मार्ली झाले तर आयुष्य संगीतमय होईल इतकेच यानिमित्ताने.

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग १०

प्रांजल. वय वर्ष सात वैगरे असेल तिचे. अगदी नाजूक पोरं. भारता बाहेर आपल्या आई वडिलांसोबत राहणारी भारतीय मुलगी आणि तिची बहीण. म्हणजे एकंदरीत ए...