गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग १०

प्रांजल. वय वर्ष सात वैगरे असेल तिचे. अगदी नाजूक पोरं. भारता बाहेर आपल्या आई वडिलांसोबत राहणारी भारतीय मुलगी आणि तिची बहीण. म्हणजे एकंदरीत एन.आर.आय फॅमिली.

शाळेत जाण्यासाठी आपल्या बहिणी सोबत घराबाहेर उभी असताना एका गाडीने मागून तिला जोरदार धडक दिली आणि प्रांजलचा उभा असलेला नाजूक साजूक जीव खाली कोसळला. तिच्या स्पायनल कॉर्डला जबदरदस्त फटका लागला होता. ताबडतोब तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले पण तिथल्या डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की, ही पुन्हा उभी राहण्याची शक्यता कमी आहे. पण एक पर्याय आहे, तुम्ही हिला मुबंईला शिफ्ट करा. तिथले डॉक्टरच काहीतरी करू शकतील.
आई बापाची माया वेडी असते. बापाने सगळे खटाटोप करून तिला स्पेशल फ्लाईटने मुंबईत आणले. आणि पुढे एअरपोर्ट वरून हॉस्पिटलला माझ्या बाजूच्या वॉर्डमध्ये रात्री २ च्या सुमारास तिला ऍडमिट केले.
मला असलेल्याच डॉक्टरांच्याचं अंडर ती ऍडमिट झाली होती. ज्या रात्री ऍडमिट झाली त्याच दिवशी संध्याकाळी माझी सर्जरी झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीचं सातच्या सुमारास डॉक्टर मला बघायला आले होते. तसे ते सहसा इतक्या लवकर येत नाही. आणि आदल्या दिवशी माझी पाच तास सर्जरी करून ते उशिरा घरी गेले होते.
मला चेक करता करता डॉक्टर बोलले, "एक छोटी बच्ची ऍडमिट हुई है कल रात को? पता है तुझे?". मी नाही म्हणालो. डॉक्टर म्हणाले, " ऍक्सिडंट हुआ है. मेजर है. स्पाईन में लगा है. कल उसको ऑपरेट करना है." इतक्या लहान लेकराची उद्या स्पाईन सर्जरी होणार आहे या विचाराने भांबावून गेलो.
गेल्या आठ वर्षात मी हॉस्पिटल मध्ये अनेक स्पाईनचे पेशंट पाहिले आहेत. त्यांच्या वेदना - त्यांचे ओरडणे भयंकर असते. आणि त्यातल्या त्यात स्पाईन म्हणजे शरीरातला एक इतका नाजूक धागा की त्याला हलका जरी धक्का लागला तरी शरीराच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास पूढे बेडला खिळूनच राहणार. आणि त्यात या लेकराची उद्या स्पाईनची सर्जरी होती.
दुसऱ्या दिवशी रात्री मी सिस्टरला विचारले की, बाजूच्या वॉर्ड मधल्या त्या मुलीची सर्जरी झाली का? सिस्टर म्हणाली, "हो ! आणि तिला ICU मध्ये ठेवले आहे. पाच - सहा दिवसाने करतील जनरल वॉर्डला शिफ्ट."
त्या पाच दिवसात माझ्या जखमेला ही इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा मला ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन इन्फेक्शन काढले होते. त्यारात्रीची आग इतकी भयंकर होती की, कोणीतरी गरम गरम शीस माझ्या जखमेवर टाकत आहे असे वाटतं होते.
माझ्या ऍक्सिडंटच्या सहा महिन्यांच्या ICU प्रवासा नंतर दोन वर्षाने मी ती भयाण रात्र पुन्हा एकदा अनुभवली होती. इतकी भयाण की हे असे दुःख - अशी वेदना शत्रूला ही कधी न मिळो.
चार दिवस कसे तरी कण्हकण्हत काढले. आग हळू हळू कमी झाली. दुखायचे ही बरेच थांबले होते. आणि एका संध्याकाळी मी मोबाईलवर रिंगा रिंगा नावाचा मराठी चित्रपट पाहत असताना हळूचं कोणीतरी माझ्या बेडचा पडदा ओपन करून आवाज दिला, "राहुल का?" मी हो म्हणालो. एक थकलेली - चार पाच दिवस तरी न झोपलेली एक आई माझ्या समोर उभी होती. त्यांनी बसू का विचारले. मी हो म्हणताचं त्या माझ्या बेडच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर बसल्या.
"माझी मुलगी प्रांजल बाजूच्या वॉर्डमध्ये ऍडमिट आहे. तिच्या स्पाईनची सर्जरी झाली आहे पाच दिवसापूर्वी. जे डॉक्टर तुम्हाला आहेत त्यांनीच केली आहे." त्यांचे बोलणे ऐकताच मला कळाले, त्या रात्री डॉक्टर ज्या मुली बद्दल म्हणाले त्या मुलीची ही आई आहे." त्यांच्या डोळ्यातले दुःख - काळजी मला माझ्या आईची आठवण करून देणारे होते. माझ्या आईने याहून भयाण काळ पाहिलाय माझ्या ऍक्सिडंट नंतर. म्हणून मला कदाचित प्रांजलच्या आईचे दुःख कळत होते - जाणवत होते.
त्या आईच्या डोळ्यात इतकी काळजी होती की, मला त्यांच्याकडे पाहून बोलण्याची हिंमत होतं नव्हती. ती आई डोळ्याला रुमाल लावत म्हणाली, "बाळा एक रिक्वेस्ट आहे?" मी म्हणालो, "रिक्वेस्ट कसली काकू? बोलाना काय झाले?" आणि त्या आईने गळ्याशी आलेला हुंदका गिळत बोलायला सुरुवात केली, "सहा दिवस झाले आहेत प्रांजलचा ऍक्सिडंट होऊन, पण सहा दिवस ती कोणाशी एक शब्दही बोलली नाही. शांत झाली आहे अचानक. कोणी काही विचारले तरी काही रिस्पॉन्स देत नाही. एकटक काहीतरी विचात करत असते. जीव घाबरा होतो माझ्या. तिच्या मनावर मोठा परिणाम झाला आहे या गोष्टीचा. आम्हाला काहीच समजत नाहीये काय करावे ते? डॉक्टरांनी सांगितले की तुला सांगून एकदा तिच्यासोबत बोलायला". आणि मला हात जोडत त्या आईने तिच्या काळजाच्या तुकड्याशी मला बोलायला विनंती केली. त्यांनी माझ्यासमोर जोडलेल्या हाताने माझ्या अंगावर काटा आणला. माझ्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. दुःख माणसाला किती लाचार बनवते हे मी डोळ्यांनी पाहत होतो. त्यांना सावरत म्हणालो, "काकू ! तुम्ही माझ्या आई सारख्या आहात. असे हात नका जोडू. मी बोलतो तिच्या सोबत. येतो मी उद्या सकाळी तिला भेटायला". ती आई ,"तुझे उपकार होतील" म्हणून माझ्या हातावर हात ठेवत निघून गेली. मला गदगदून आले होते.
त्या नंतर माझ्या डोक्यात विचाराने थैमान घातले. माझ्या डॉक्टरांना का वाटले असेल की, मी बारीकश्या जिवाला बोलते करू शकतो म्हणून? की त्यांना ठाऊक होते, एक वेदना दुसऱ्या वेदनेशी बोलू शकते - तिला समजू शकते. असे खूप काही माझ्या आत सुरू होते. या विचारातच तो दिवस आणि रात्र गेली. आणि दुसरा दिवस उजाडला.
सकाळ झाली. माझे डायपर चेंजिंग करून - स्पंजिंग करून मी तयार झालो. माझ्या मांडीवर घातलेले पंचवीस टाके मला टोचून टोचून त्रास देत होते. वेदनेने कासाविस करत होते. आणि तेवढ्यात मी हॉस्पिटल मधल्या मित्राला म्हणालो, "व्हील चेअर घे ना. मला बाहेर जायचे आहे." मी बोललेले शब्द ऐकून कोणाला काही कळायला मार्ग नव्हता. माझा त्रास त्यांना कळत होता - माहीत होता. तरी तीन चार जणांनी मला बेडवरून उचलत व्हील चेअरवर बसवले. मी सर्जरी नंतर व्हील चेअर बसतोय हे त्यांना आनंद देणारे होते. इतकी कळ लागत होती पायाला की माझ्या डोळ्यात पाणी आले. पाठीला आणि आजूबाजूला उशीचा सपोर्ट लावून मी म्हणालो, "बाजूच्या वॉर्डला प्रांजल आहे ना तिच्या बेडजवळ घेऊन चल". आणि व्हील चेअर वर मी प्रांजलच्या बेडजवळ आलो.
प्रांजलच्या बेडचा हळूचं पडदा खोलला तर, "ती एकटक खिडकीच्या बाहेर नजर लावून होती. तिच्या डोळ्यात मी तेव्हा शून्य पाहिला होता. आणि तिची आई डोळे बंद करून खुर्चीवर बसली होती". मी पडदा खोलता बोललो, "गुड मॉर्निंग बेबी" ती दचकली माझ्या आवाजाने. तिची आईही एकदम उभी राहिली. आणि माझ्याकडे पाहू लागली. आणि मग मी बोलायला सुरुवात केली.
प्रांजलकडे पाहत म्हणालो, "कशी आहेस? काय केला आज नाश्ता?" ती काहीच बोलायला तयार नव्हती. तोंड फिरवून पुन्हा खिडकीकडे पाहू लागली. तिची आई माझ्याकडे भरल्या डोळ्याने पाहत होती. मी त्यांना डोळ्यानेच मान हलवत काही नाही म्हणून सांगितले. आणि पुन्हा बोलायला लागलो, "अरे काही नाही. तुझ्या स्कुल मध्ये माझ्या फ्रेंडचा मुलगा आहे. जॉन. तू ओळखते का त्याला? माझ्या फ्रेंडणे मला फोन करून सांगितले की त्याच्या मुलाची क्लासमेट ऍडमिट आह इंडिया मध्ये तिला भेटून कशी आहे सांग म्हणाला फोन करून. म्हणून तुला भेटायला आलो". पण प्रांजल एक शब्दही बोलली नाही की काही रिस्पॉन्स दिला नाही. फक्त माझ्याकडे बघून एकचं शब्द म्हणाली, "माझ्या क्लास मध्ये कोणी जॉन नाही. तू जा". मी ओके ओके म्हणत तिथून निघून गेलो. तिच्या आईला वाटले. ती माझ्या व्हील चेअर मागे येऊन मला सॉरी म्हणाली. "अरे काकू सॉरी का? मला फक्त तिचा आवाज ऐकायचा होता. तुम्ही नका मनाला लावून घेऊत". आणि पुन्हा व्हील चेअर ने माझ्या बेडवर आलो.
पुन्हा माझ्या डोक्यात काय करावे हे सुरू होते. आणि तितक्यात प्रांजलची आई मला भेटायला आली, "राहुल ! ती मला विचारत आहे. माझ्या क्लास मध्ये जॉन कोण आहे? तिला तो आठवत नाहीये". मी हसलो आणि म्हणालो काकू काळजी करू नका तिर निशाण्यावर लागला आहे. मी येतो उद्या पुन्हा तिला भेटायला.
ह्यूमन सायकॉलॉजीचा एक लेसन मला अगदी पक्का माहित होता. कदाचित तो अनुभवातून अजून घट्ट झाला होता की, एखाद्याच्या दुःखात तुम्ही त्याच्या पॉजिटीव्ह गोष्टी ट्रीग करायचा प्रयत्न करा तो सगळे दुःख विसरुन त्याची पॉजिटीव्हिटी तुम्हाला पास करतो. आणि हेच डोक्यात ठेवून दुसऱ्या दिवशी पुन्हा व्हील चेअर वर बसून छोटीला भेटायला गेलो.
ती नेहमी सारखी एकटक खिडकी बाहेर बघत झोपली होती. मी पडदा खोलला आणि माझ्या फोन वाजल्या सारखे नाटक करून फोन कानाला लावत हॅलो म्हणालो. पण ती माझ्याकडे पाहायला तयार नव्हती. काकू बसल्या होत्या बाजूला. आज प्रांजलचे वडील ही होते तिथेच. मी हॅलो बोलून फोनवर बोलायला सुरुवात केली. अगदी टुकार इंग्लिश मध्ये फोनवर बोलायला लागलो. म्हणजे एकाही वाक्याचा ना टेंस योग्य होता ना प्रोनौसेशन ना काहीच. मुंबई इंग्लिश स्टाईल मध्ये बोलत होतो. You come visit me tommorow वैगरे वैगरे आणि थोड्या वेळाने मी फोन ठेवता प्रांजलने माझ्याकडे पाहत विचारले, "which language?" मी म्हणालो, "इंग्लिश". तिने ऐकताचं झटकन रिऍक्ट झाली, "स्टूपीड ! हे इंग्लिश नाहीये". ती मला बोललेली स्टूपीड ऐकून प्रांजलच्या आई वडिलांना वाईट वाटले. ते तिला काही बोलायच्या आधीच मी बोललो, "मग कशी असते इंग्लिश? मी तर अशीच बोलतो." प्रांजल, "बॅड इंग्लिश बोलतो तू." मी, "तू शिकवशील का मला गुड इंग्लिश?". आणि प्रांजल हो म्हणाली.
पुढे पाच दिवस न चुकता सकाळी अर्धा तास मी कसा बसा व्हील चेअर वर बसत प्रांजल कडून इंग्लिशचे क्लास घेतले. प्रांजल हळू हळू खुलत होती. तिच्या आई वडिलांच्या डोळ्यातला तो आनंद - ते समाधान मला करोडो रुपयांपेक्षा ही जास्त किंमतीचे वाटतं होते. इंग्लिश शिकता - शिकवता माझ्यात आणि प्रांजल मध्ये घट्ट नाते तयार झाले होते. तिच्या वडिलांनी तिला काही खाऊ आणला तर त्यातला थोडा ठेवून ती दुसऱ्या दिवशी पर्यंत माझी वाट पाहत बसायची.
असेच रोज सुरू असताना माझ्या डिस्चार्जचा दिवस आला. आणि त्याच्या आदल्या दिवशी सकाळी मी प्रांजलला बोललो, "चल आज माझा लास्ट डे आहे. उद्या सकाळी मी घरी जाणार. आता तुझी माझी भेट नाही होणार". ऐकताच प्रांजल एकटक माझ्याकडे पाहत राहिली. मला माहित नाही तिने माझ्यात काय शोधले होते पण मी बोलताच ती 'मम्मी' बोलून तिच्या आईकडे पाहतं मुसूमुसु रडू लागली. मला ते सहन नाही झाले, "ओय रडते कशाला. तू घरी गेली की मी येतो ना? नाहीतरी मी नेक्स्ट विक येणार आहे जॉनच्या पप्पांना भेटायला तुमच्या कंट्री मध्ये." प्रांजलने माझ्या करंगळीत तिची करंगळी अडकवत माझ्याकडून पक्का प्रॉमिस घेतले. आणि मी पुन्हा प्रांजलचा शेवटचा इंग्लिश क्लास संपवून माझ्या बेडजवळ गेलो.
त्या दिवशी संध्याकाळी असाचं डोळे बंद करून पडलो होतो. आणि तितक्यात प्रांजलची आई आली, "राहुल बघ तुला भेटायला कोण आले आहे ते". मी मान वळवून पाहिले तर प्रांजल व्हील चेअर वर बसून मला भेटायला आली होती. तिला पाहताच माझ्या तोंडून शब्द निघाला, "क्या बात है". हळू हळू प्रांजल माझ्या बेडजवळ आली. तिच्या वडिलांकडे तिने पेन मागितला. आणि मला हात सरळ करायला सांगितला. मी हात पुढे करताच प्रांजल माझ्या मनगटावर काहीतरी बांगडी सारखं बनवू लागली. मी विचारले काय आहे हे? तर ती म्हणाली, "फ्रेंडशिप बँड". ऐकताच सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. प्रांजलची आई बाहेर जाऊन हुंदके देत रडली. मलाही भरून आले होते पण मी मन घट्ट करून दाबून ठेवले. माझ्या मनगटावरचे नक्षीकाम पूर्ण होताच प्रांजलने मला विचारले, "कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस तू?" मी म्हणालो, "इंजिनिअर". आणि तिने रागात माझ्या कडे पाहून म्हंटले, "चिटर". मी म्हणालो, "अरे नाही मराठी मिडीयम मधून केले इंजिनिअर". प्रांजलचे आई वडील हसत होते. आणि ती मला बाय बोलून पुन्हा तिच्या बेडकडे निघाली.
माझ्या मनगटावर प्रांजलने पेनाने काढलेला तो फ्रेंडशिप बँड हळू हळू फिकट होऊ लागला. पण माझ्या मनात तिने कोरलेला बँड आजही तसाच आहे.
दुसरा दिवस उजाडला. मी घरी जायला निघालो. प्रांजलचे आई वडील मला भेटायला आले.पार्करचा एक पेन त्यांनी मला भेट म्हणून दिला. मी ही तो आनंदाने स्विकारला. त्यांना खूप काही माझ्याशी बोलायचे होते पण त्यांना ते बोलता येत नव्हते हे मला जाणवले. मी एका कागदावर,
"Dear Pranjal Madam
Don't stop
When you're tired.
Stop when you are DONE
- your student
Rahul
असे लिहून एक कॅडबरी आणि तो कागद हे प्रांजलसाठी म्हणून त्यांच्या हाती दिले आणि वॉर्डच्या बाहेर पडलो. जाताना मला प्रांजलला भेटायची हिंमत झाली नाही. मी तिला न भेटताच हॉस्पिटलच्या बाहेर पडलो. मी घरी गेल्या नंतर त्या दिवशी प्रांजल खूप रडली असे मला नंतर कळले.
पाच वर्ष झाली असतील या साऱ्या गोष्टीला. प्रांजलचं वय सध्या बारा वैगरे असेल. तिला मी आठवत असेल का? मी लिहिलेला कागद अजूनही तिच्या जवळ असेल का? असे मनात येत राहते. इतकेच वाटतं राहते की, प्रांजलनेही कधीतरी कोणाला हॉस्पिटलला भेटायला गेल्यावर त्याला, "Don't stop when you're tired. Stop when you are DONE. हे एका कागदावर लिहून त्याला द्यावे. आणि हा कागदाचा प्रवास असाच पूढे पुढे चालत रहावा.
मी आजही हॉस्पिटलमध्ये गेल्यावर. ज्या ज्या वेळी उपचारासाठी मला मनगटावर सलाईनची आयव्ही लाईन टाकतात तेव्हा त्या निडल मध्ये मला प्रांजलच्या पेनाचा शार्पनेस जाणवतो. आणि मग मी स्वतःलाचं म्हणतो, "Don't stop when you're tired. Stop when you are DONE. you are DONE."
- राहुल सिद्धार्थ साळवे
वाशी, नवी मुंबई

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग ९

२०१२ ची गोष्ट आहे. मुस्कान नावाची ९ वर्षाची लहानशी चिमुरडी लिलावती हॉस्पिटलच्या भिंतीत मैत्रीण झाली होती. तिचा माझा वॉर्ड वेगळा. कॅन्सरच्या आजाराने तिच्या नाजूक जिवाला आणि निरागस बालपणाला विळखा घातला होता. तिला त्याची पुसटशी कल्पनाही नव्हती. आणि असेल तरी कशी. बापाविना वाढलेली पोरं. आईच्या तोंडात २४ तास गुटख्याचा वावर. आजोबा बिचारा थकलेल्या वयातही बांद्रा मध्ये रिक्षा चालवून नातीच्या जगण्याची दुवा आणि दवा दोन्हीची तरतूद करत होता.

मुस्कान मला भेटण्याआधी केमो थेरपीने तिला अर्धी केली होती. पण पोरगी चुनचुनीत. सलमानच्या मैने प्यार किया पासून बॉडीगार्ड पर्यंतची सगळी गाणी तोंड पाठ. ती एकूण एक गाणी नंतर तिने जबरदस्तीने मला ऐकवली. मी ही ऐकली. रोज येऊन बसायची माझ्या बेड जवळ. खोटं का असेना पण बोलायची, "तू हिरो माफित दिखता है". मलाही ऐकून आनंद वाटायचा. कारण, त्यात तिला आनंद वाटायचा. ज्याचे मोजमाप करणे अवघड होतो.
एका रात्री १२.३० च्या सुमारास तिच्या रडण्याचा आवाज लिलावती हॉस्पिटलच्या गर्द शांततेत घुमला. त्याच दिवशी दुपारी माझीही ब्लॅडरची सर्जरी झाली होती. त्यामुळे मीही गुंगीतच होतो. सिस्टर मुस्कानला घेऊन माझ्या बेडजवळ आली आणि मला उठवत म्हणाली, "इसको बोल ना राहुल, प्लेटलेट्स चढाना है". मी मुस्कानला बोललोही पण त्यादिवशी ती माझेही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
माझ्या बेडच्या बाजूला खाली वडिल झोपले होते. मी हॉस्पिटल मध्ये असताना वडील रात्री थांबायचे. आजही थांबतात. एक बाप म्हणून त्यांनी माझ्यासाठी भोगलेले सांगायला माझे आयुष्य कमी पडेल. असो.
सिस्टरने मला दिलेला आवाज ऐकून वडील उठले. तशी त्यांची आणि मुस्कानची ती पहिलीच भेट. ते उठून उभे राहिले. मुस्कान जवळ जाऊन, "ऐसा नहीं करते बेटा, ठीक होना है ना?" इतकचं काय ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोललो. आणि मुस्कान एक शब्दही न बोलता तिच्या वॉर्ड मध्ये निघून गेली. सिस्टर तिच्या मागे जाता जाता पप्पांना thank you अंकल म्हणाली आणि पप्पा पुन्हा माझ्या बाजुला येऊन खाली झोपले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता कोणीतरी माझ्या बेड जवळ येऊन, "पप्पा उठो सुबह हो गयी" असे बोलताना ऐकू आले. माझे डोळे उघडले तर समोर मुस्कान होती. माझ्या वडीलांना पप्पा म्हणत आवाज देत होती. कदाचित काल रात्री वडिलांनी तिच्या डोक्यावरून फिरवलेल्या हाताची माया होती ती. मग पुढे पप्पा आणि मुस्कान हे नातचं झाले.
मुस्कान आईला मम्मी आणि वडिलांना पप्पा म्हनू लागली. सगळ्यांपेक्षा तिचे पप्पांशी जास्त जमायचे. ती त्यांना जोक सांगायची आणि जोरजोरात हसायची. कधी कोडी घालायची. त्यांच्याकडे गाणं म्हणण्याचा हट्ट करायची. बाप लेकीचे हे नवीन नाते आम्ही सगळे अनुभवत होतो.
दिवस सरत चालले होते. कॅन्सर मुस्कानच्या चेहऱ्यावर हळू हळू ताबा मिळवत होता. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस तेज ढळू लागले होते.
एक दिवस मी डिस्चार्ज घेऊन घरी निघालो. तेव्हा मुस्कान तिच्या वॉर्डच्या दारात उभी राहून एकटक पप्पांकड़े पाहत होती. डोळे पाणावले होते तिचे. ते पाणावलेले डोळे आजही अस्वस्थ करतात.
मी घरी आल्या नंतर मुस्कानचे रोज फोन सुरु झाले. काही दिवसाने तिलाही हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला.
मुस्कनला पप्पांचा मोबाईल नंबर तोंड पाठ होता. रात्रीचे १२ वाजलेले असू की १, तिला पप्पांची आठवण आली की, ती फोन करायची, "पप्पा आपकी बहोत याद आती है. कल मम्मी को पुलाव लेके भेजो". की, आई दुसऱ्या दिवशी पुलाव घेऊन पोहचायची बांद्राला.
काही दिवसाने मुस्कानचा वाढदिवसाला आला, "जब तक पप्पा नहीं आयेगा मैं केक नहीं काटूंगी" हां तकादाच लावला होता तिने. पण वडील गावी असल्यामुळे त्यांना जाणे शक्य नव्हते. मग रात्री ९ वाजता रोहित ( माझा भाऊ ) गेला तेव्हा कुठे केक तिने कापला. तो पर्यंत मुस्कान राहत असलेल्या चाळीतली सगळी माणसे पप्पांची वाट पाहत बसले होते. रोहित आलेला पाहून मुस्कानला राग आला. तिने लगेच पप्पांना फोन लावून खडसावले होते.
पुढे दोन दिवसाने वडील गावावरून आले आणि लगेच मुस्कानला भेटायला गेले. त्यादिवशीही अख्खी चाळ गोळा केली होती मुस्कानने सांगून की, "आज मेरा पप्पा आयेगा."
कॅन्सर मुस्कानला हळू हळू खात होता. पुन्हा काही दिवसाने तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट केले. केमो - ट्रीटमेंट सुरु झाले. आणि २५ डिसेंबरला सकाळी ६ वाजताचं मुस्कानचा पप्पांना फोन आला. ती म्हणाली "आप आज आना पप्पा. मैने पुरे वॉर्ड को बोला है की, आज बुड्ढ़ेकी टोपी और मुहँ लेके पप्पा आयेगा."
त्याच दिवशी २५ डिसेंबरला आमच्या ओळखीतल्या एका व्यक्तीचे निधन झाले होते. वडील तिकडे गेल्याने त्यांना तिथेच बराच उशीर झाला. मुस्कानचे त्यांना फोनवर फोन सुरूच होते. संध्याकाळचे ७ वाजून गेले होते. आणि मुस्कानच्या आजोबांचा वडिलांना फोन आला. पोरीने दिवसभर अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता. ती एकच वाक्य बोलायची, "जब पप्पा आयेगा तब खाऊँगी". वडिलांना ते सहन झाले नाही. आणि रात्री ९ वाजता वडिल टोपी, मास्क आणि विडिओ गेम घेऊन लिलावती हॉस्पिटलमध्ये पोहचले. त्यादिवशी तिचा आनंद गगनाशी भिडला होता. ३ वर्षाच्या ट्रीटमेंट मध्ये ती त्यादिवशी मनसोक्त आणि पोटभर जेवली होती. कारण, त्या रात्री ९ वाजता तिच्यासाठी, तिच्या आनंदासाठी टोपी, मास्क , गिफ्ट घेऊन आलेला तो उंच पूरा,धिप्पाड माणूस खऱ्या अर्थाने तिच्यासाठी सांताक्लॉज होता. तो तिचा सांताक्लॉज तिच्या मनामनात, रोमारोमात शेवट पर्यंत इतका घट्ट राहिला की, काही महिन्यानंतर मुस्कान ज़िव सोडताना तिच्या तोंडातून एकच शब्द शेवट पर्यंत बाहेर पडत होता की, "पप्पा को बुलाओ. पप्पा को बुलाओ".
आज ती मुस्कान नाही. तिचा फोन ही त्यानंतर कधी आला नाही. पण तिच्या सांताक्लॉजने तिला शेवट पर्यंत आनंद दिला. आणि तो सांता, मला वडिल रुपाने लाभला हेच माझे भाग्य आहे. माझ्याही डोक्यावर त्याचा हात तसाच आहे. आधाराचा ! हिमतीचा !
आजही घरात कधी मुस्कानचा विषय निघाला की वडील शांत होतात. त्यांच्या डोळ्यात आजही मला मुस्कान दिसते. ख्रिसमसची टोपी डोक्यावर घालून - तोंडावर सांताक्लॉजचे मास्क लावून - व्हिडीओ गेम खेळत बसलेली मुस्कान. आजही दिसते वडिलांच्या डोळ्यात. आजही दिसते.
- राहुल सिद्धार्थ साळवे
वाशी, नवी मुंबई

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग ८

सहा फूट उंच. पांढरी शुभ्र दाढी. अंगावर चढवलेली पठाणी. डोळ्यात सुरम्याच्या सांज कडा आणि श्वासातून दरवळणारे जादूई अत्तर. एखाद्या हिरो सारखे दिसायचे उस्मान अंकल.

उस्मान अंकल म्हणजे जुन्या चित्रपटांचे चालते बोलते विद्यापीठचं. सत्तर ऐंशीच्या काळातले कोणतेही गाणे उस्मान अंकलला विचारावे आणि त्यांना त्या गाण्याचा गीतकार - संगीतकार - गायक माहीत नसावा हे शक्य नाही. माहीम मध्ये अंकलचे छोटेखानी हॉटेल होते लजीज नावाचे. अंकलच्या बोलण्यात कळले होते की, ९० च्या काळात अंकलने ते विकून टाकले होते. पण हॉटेल मध्ये सतत सुरू असणकऱ्या रेडिओने अंकलने जोपासलेला हा आगळा वेगळा चित्रपट गाण्यांचा छंद कमालीचा होता. उस्मान अंकल मला लाडाने छोटे म्हणायचे.
हीना आंटी. उस्मान अंकलची बायको. साठ वैगरे वय असेल हीना आंटीचे. दोन्ही किडन्या फेल झाल्याने हीना आंटी दरवेळी डायलिसिस साठी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असायची. हॉस्पिटलचे जेवण आली की हीना आंटी नेहमी बोलायची, "आ गयी मुसीबत. ना नमक है, ना मिर्च ना कुछ सिर्फ उबलके देते है". उस्मान अंकल चेष्टेत म्हणायचे, "अरे तू हॉस्पिटलमें है हॉटेल में नही जो तुझे डाल घोश मिलेगा". हीना आंटी नकोच म्हणायची. मग उस्मान अंकल एखाद्या लहान लेकरासारखी तिची समजूत काढायचे, "घोश समझकर खा देख टेस्टी लगेगा." आंटी ही आपली पर्याय नसल्याने नाक तोंड मुरडत आपली मुकाट्याने खायची.
'घोश समझकर खा टेस्टी लगेगा' उस्मान अंकलच्या यावाक्यात त्यांच्या हॉटेल व्यवसायाचा अनुभवत जाणवायचा. उस्मान अंकलने कष्ट करून दोन मुली आणि एक मुलगा उच्चशिक्षित केले होते. खरतरं अंकल म्हणायचे, "परिंदे को पंख दिये जाते है उसे उडणा नही सिखाते". त्यांचा मुलगा बँगलोरला नोकरी करत होता. आणि मुली लग्न करून आपल्या घरी सुखात होत्या. पण या साऱ्या संसाराच्या जंजाळात आपल्या बायकोकडे आपल्याला जास्त लक्ष देता आले नाही या विचाराने अंकल अस्वस्थ व्हायचे.
खरतरं हीना आंटीची किडनी ट्रान्सप्लांटही शक्य नव्हती. त्यामुळे ती जेवढी डायलिसिस वर जगेल तितकेच तिचे आयुष्य होते.
एक दिवस डायलिसिस करताना हीना आंटी सिरीयस झाली. तिला इमर्जन्सी ICU मध्ये शिफ्ट केले. उस्मान अंकल सैरभैर झाले होते. मुलाला आणि मुलीला फोन करून बोलावले. घाई घाईत सगळं सामान ICU मध्ये घेऊन जाताना मला इतकेचं म्हणाले, "हीना सिरीयस हो गयी है. ICU में शिफ्ट किया डायलिसिससे. आंटी के लिए दुवा कर छोटे". अंकलचे शब्द ऐकून माझे हात पाय थंड पडले. पण मी उठून अंकलला आधार ही देऊ शकत नव्हतो. त्या सगळ्या गडबडीत उस्मान अंकलचे पाकीट कुठेतरी पडले. रात्री उशिरा उस्मान अंकल पुन्हा जनरल वॉर्डमध्ये येऊन शोधू लागले तेव्हा कळले.
त्यादिवशीची उस्मान अंकलची बैचेनी पहावत नव्हती. मी विचारताच अंकल म्हणाले, "मेरा बटवा कही गिर गया है." मी, "कितने थे पैसे". "पैसे छोड दे मेरे ब्लड प्रेशरकी गोली रखता था में उसमें". ऐकून वॉर्ड मधले बाकीच्या पेशंटचे नातेवाईकही उस्मान अंकलचा बटवा शोधू लागले पण सापडला नाही. अंकलला विचारले, "क्या नाम है गोली का?". उस्मान अंकलला त्यागोळीचे नाव माहीत नव्हते. त्यांना म्हणाला, "बच्चे को फोन करके पुछ लो अंकल. डरो मत". त्यांनी मुलाला फोन लावून माझ्याकडे दिला. अंकलचे हात थरथर कापत होते. मी फोनवर बोलता अंकलच्या मुलाने गोळीचे नाव SMS केले. अंकलला बोललो, "मै कुछ करता हूँ. मंगवाता हू गोली." लगेच वडिलांना फोन केला पण ते जस्ट घरून निघाले होते हॉस्पिटलला यायला. म्हणजे त्यांना पोहचायला तरी दीड दोन तास लागणा हे नक्की होते. आणि प्रिस्क्रिप्शन नाही तर तेही काही करू शकणार नव्हते. काय करावे सुचत नव्हते. अंकलला बोललो, "आप जाओ नीचे ICU आंटी के पास. गोली आयेगी तो मैं फोन करुंगा आपको". अंकल लगेच निघून गेले.
काहीच कळायला मार्ग नव्हता. अंकलचे थरथरते हात आठवते होते. आणि कसलाच विचार न करता मित्र संदीपला फोन लावला. तो कुर्ल्याच्या जवळपास कुठेतरी होता. त्याला घडलेले सगळे एक दमात सांगितले. त्यालाही काय करावे कळेना. संदीप एकच वाक्य म्हणाला, "मी करतो काहीतरी जुगाड आणि येतो हॉस्पिटलला गोळी घेऊन". आणि एक तासाने संदीपचा फोन आला, "हॅलो ! हॉस्पिटलच्या खाली उभा आहे रे." संदीप अंकलची गोळी घेऊन आला होता. कशी आणि कुठून हे संदीपने कधी सांगितले नाही. आज संदीप असता तर हे वाचून हसला असता. पण उस्मान अंकलच्या ब्लड प्रेशरच्या गोळीसाठी त्याने जुगाड केला खरा, पण आज पासून सहा वर्षापूर्वीचं संदीप हार्ट अटॅकने गेला. कायमचा. बायको - दोन लेकरं आणि सगळं सगळं मागे सोडून.
उस्मान अंकलला फोन करून बोलावले. त्यांना गोळी दिली आणि लगेच खा म्हणालो. पण उस्मान अंकलने काही खाल्ले नव्हते म्हणून एक मारी बिस्कीट ऑर्डर करून मागवले आणि मग बिस्कीट खाऊन उस्मान अंकलने ब्लड प्रेशरची गोळी घेतली. त्याक्षणाचे समाधान मोठे होते. तो क्षण आजही आठवतो आणि संदीपही. दुसऱ्या दिवशी दुपारी उस्मान अंकलचा बटवा हॉस्पिटलच्या फाईल ठेवलेल्या पिशवीत सापडला.
उस्मान अंकलचा मुलगा फ्लाईटने पहाटेच मुंबईत उतरला होता. एअर पोर्ट वरून त्याने डायरेक्ट हॉस्पिटल गाठले. हीना आंटीला भेटला आणि लगेच मला भेटायला आला. माझ्या बेडजवळ येताच,"भाई thank you so much. कल डॅडी को गोली लाकर देने के लिए". आणि बोलता बोलता त्याने खिशातून पैसे काढून देऊ लागला. "बस क्या ! भाई बोलता है और पैसा देता है". माझे शब्द ऐकून त्याला भरून आले. मी सांगितले त्याला की मित्राने औषध आणले. तो म्हणाला, "वो आयेंगे तो मुझे फोन करना. आउंगा उन्हे मिलने".
हीना आंटी आता स्टेबल झाली होती. तीन दिवस ICU मध्ये राहिल्यावर तिला आता जनरल वॉर्डला शिफ्ट केले होते. त्या तीन दिवसात ICU मध्ये शक्य नव्हते तर उस्मान अंकल माझ्या बेडजवळ येऊन नमाज वाचायचे. मी खूप जवळून पाहिलं आहे उस्मान अंकलला अल्ला सोबत बोलताना. पुढे दोन दिवसाने हीना आंटीला डिस्चार्ज दिला. जाताना उस्मान अंकल आणि त्यांच्या मुलाच्या डोळ्यात पाणी आले. माझ्या हातात हात देत उस्मान अंकल म्हणाले, "चलता हूँ छोटे." मी माझा आवडता डायलॉग म्हणालो, "बस दुवा में याद रखना अंकल". दाटलेल्या स्वरात अंकल बोलले, "ये भी कोई बोलने वाली बात है".
सात वर्ष झाले या साऱ्या घटनेला. हीना आंटी घरी गेल्या नंतर उस्मान अंकलच्या मुलासोबत पुढे सहा महिने बोलणेही झाले फोनवर अनेकवेळा. नंतर त्याचा मोबाईल नॉट रीचेबल झाला. कदाचित तो आऊट ऑफ इंडिया गेला असेल नोकरीसाठी. नाहीतरी उस्मान अंकल बोलायचेच, "परिंदे को पंख दिये जाते है. उसे उडना नही सिखाते".
खरतरं हीना आंटी आता असेल का?. उस्मान अंकल कसे असतील?. त्यांना गोळी घेताना संदीपची आठवण आजही येत असेल का? असे अनेक प्रश्न डोक्यात येत राहतात. अत्तरचा जेव्हा जेव्हा कुठे सुगंध येतो मला उस्मान अंकल आठवतात.
मनात उगाच वाटतं राहते. उस्मान अंकलचा मुलगा कधीतरी भेटेल. काही नाही मला फक्त त्याला एकच सांगायचे आहे की, "संदीप थेट अल्लाकडे गेला आहे उस्मान अंकलसाठी दुवा मागायला."
उस्मान अंकलच्या हृदयाला जपलेला संदीप, स्वतःच्या हृदयाला जपू शकला नाही. २८-२९ हे काही वय नसते हार्ट अटॅकने जायचे. तरी संदीप न सांगता गेला होता. त्याच्या सोबतच्या अनेक आठवणी आजही मनात लख्ख आहेत.
संदीप गेला त्यावर्षी ईदला दोन ओळी लिहिल्या होत्या,
"मेरा यार मिले मुझे
बस वही मेरी ईद है !"
पण एक गोष्ट खरी आहे त्यारात्री उस्मान अंकलच्या हृदयावर संदीपने त्याचे नाव लिहिले. कायमचे.
आपल्या आयुष्यात असे अनेक उस्मान अंकल येतात. आणि आपल्याला त्यांचा संदीप होण्यासाठी आधी एक निस्वार्थी माणूस व्हावे लागेल.
संदीप गेल्या नंतर दोन वर्षाने आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या व्यक्तींच्या बायपास सर्जरीसाठी मदत गोळा करण्याचा प्रयत्न करू लागलो. संदीपने जात जाता मनात पेटवलेल्या ह्या माणूसकीच्या ठिणगीने आज पर्यंत आठ रुग्णांसाठी बायपास सर्जरीचा खर्च जमा करून मदत करु शकलो, हिच संदीपला. त्याच्यातल्या माणसाला. आणि दोस्ताला आदरांजली.
.......मिस यू रे संदीप दोस्ता मिस यू !
- राहुल सिद्धार्थ साळवे
वाशी, नवी मुंबई

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग ७

 ....आणि औरंगाबादच्या गजाननची बाईक समोर असलेल्या शिगांच्या ट्रकवर अशी काही आदळली की त्याच्या दोन्ही डोळ्यातून शिगा आरपार गेल्या. पण पठ्या वाचला होता.

घामावर शेती पिकवणाऱ्या बापाचा गजानन एकुलता एक मुलगा. दोन मुली सासरी बापाच्या कष्टाचं सोनं करत होत्या.
गजाननच्या डोळ्यात आरपार गेलेल्या शिगा पाहून तो बाप चक्कर येऊन कोसळला होता. पण पुन्हा सावरला. उभा राहिला. औरंगाबादच्या डॉक्टरांनी सांगितले की गजानन वाचणे शक्य नाही, तरी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. आभाळासारखा बाप कोलमडून पडला होता. त्याने एकच प्रश्न डॉक्टरांना विचारला, "काय केलं तर पोरगं वाचेल?" डॉक्टर म्हणाले, "मुंबईत काही झाले तरचं पण तिथला खर्च तुम्हाला झेपणार नाही". पण गजाननच्या शेतकरी बापानं कसलाही विचार न करता एका मित्राला सोबत घेऊन अंगावरच्या कपड्यांनी लेकराला ऍम्ब्युलन्स मध्ये टाकून थेट मुंबई गाठली.
गजाननला हॉस्पिटलला आणले तेव्हा रात्रीचे ३ वाजले होते. ICU च्या वॉर्डमध्ये झालेल्या धावपळीने मला जाग आली. सिस्टरला विचारता ती म्हणाली, "ऍक्सिडंट की केस है. मेजर है. तेरे एजका लडका है". मी ok म्हणत पुन्हा झोपलो.
दुसऱ्या दिवशी आठ तास सर्जरी करून त्याच्या दोन्ही डोळ्यात गेलेल्या शिगा बाहेर काढल्या गेल्या. डॉक्टरांनी खूप प्रयत्न करून गजाननचा एक डोळा वाचवला होता. आणि एक अखेर कायमचा निकामी झाला.
सर्जरी करून गजाननला ICU मध्ये शिफ्ट केले तेव्हा त्याचे वडील पोराच्या डोळ्यावरच्या पांढऱ्या पट्टया पाहून घायमोकळून रडल्याचे आई आजही गजाननची आठवण आली की सांगते.
भिरभिरत्या पाखरासारखे गजाननचे वडील ICU च्या वॉर्डमध्ये दिवसरात्र बसलेले असायचे. पाच दिवस झाले असतील गजाननच्या सर्जरीला पण त्याचे वडील आणि मित्र सोडता कोणी हॉस्पिटल मध्ये फिरकले ही नव्हते. गजाननचे वडील बोलायचे नातेवाईकांना वाटते की पोराला इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणलंय तर मी त्यांना पैसे मागेल म्हणून कोणी इथे फिरकत नाही.
औरंगाबाद वरून कपड्यांनिशी आलेला हा बाप तब्बल सहा दिवस उपाशी होता. आणि हे आईच्या लक्षात आले. तिने एक दिवस त्यांना विचारले,
..."काका कोण आहे ऍडमिट तुमचे".
"माझा मुलगा ऍडमिट आहे पोरी. डोळ्यात शिगा गेल्या गावी. सहा दिवस झाले ऑपरेशन झालं आहे."
..."तुम्ही जेवता वैगरे कुठे मग? इथेच असता दिवसरात्र बसलेले? काही खाता की नाही."
"लेकराला सोडून कुठे जाऊ. त्याच्या आईला सांगून आलोय पोराला घरी घेऊनच येतो". त्या बापाचे शब्द ऐकून आईच्या पोटात गोळा आला. ती एकही शब्द न बोलता तिच्या जागेवर जाऊन बसली.
आई रोज वडिलांसाठी येताना घरून जेवणाचा डबा घेऊन यायची. हॉस्पिटल मध्ये बाहेरून काही आणण्याची परवानगी नव्हती. आणि हॉस्पिटलचे जेवण खिश्याला परवडणारे नव्हते. म्हणून आईने आणलेला डब्बा आई आणि वडील हॉस्पिटलच्या मॉरच्युरी जवळ उभे राहूनच खायचे. एकदा आई हातात डबा धरायची तेव्हा वडील जेवायचे. नंतर वडील हातात डबा धरून उभे राहायचे तेव्हा आई जेवायचे. मॉरच्युरीच्या त्या भयाण शांततेत आई वडिल चार महिने उभ्यानेचं जेवले होते.
आज आईने गजाननच्या वडिलांसाठीही डबा आणला होता. दुपार होताच ती म्हणाली, "काका चला खाली. जेवून घ्या. डबा आणला आहे." गजाननच्या वडिलांना आईचे हे वाक्य धक्का देणारे होते. पण पोटातली सात दिवसाची भूक आणि आपल्या पोराला सहीसलामत घरी घेऊन जाण्याचा बायकोला दिलेला शब्द त्यांना अस्वस्थ करत होता. ते आधी नकोच म्हणाले. शेवटी, "तुम्ही नीट राहिलात तर पोराकडे लक्ष देता येईल. असं सात दिवस उपाशी राहून तुम्हाला काही झाले तर कोण बघेल तुमच्याकडे?" असं आई बोलताच पाणावलेल्या डोळ्यांनी गजाननचे वडील आई पप्पांसोबत खाली मॉरच्युरी जवळ जेवायला गेले.
आईला आजही आठवते. दोन ज्वारीच्या भाकरी आणि मेथीची भाजी गजाननच्या वडिलांनी लहान लेकरासारखी तोंडात कोंबून थेट गिळली आणि पुन्हा लगेच वर ICU च्या लॉबीमध्ये आले.
पुढे व्हिजिटिंग टाईममध्ये ICU मध्ये गजाननला भेटायला आले की ते माझ्या बेडजवळ ही यायचे. आईने मला सांगितले होती की यांचा मुलगा ऍडमिट आहे. त्यादिवसानंतर जवळपास चार महिने आई गजाननच्या वडिलांसाठी डब्बा घेऊन येऊ लागली.
आपल्या लेकरांच्या आयुष्याचा ICU मध्ये चाललेला हा घडाळ्याच्या काट्यावरचा खेळ पाहत पाहत. दोन बाप आणि एक आई ICU च्या लॉबीमध्ये एकटक बसलेले असायचे. आणि एक दिवस डॉक्टरांनी गजाननच्या वडिलांना सांगितले की, "गजाननला दोन बॉटल रक्त लागणार आहे. काहीतरी व्यवस्था करा."
औरंगाबाद वरून अंगावरच्या कपड्यावर आपल्या लेकराला थेट मुंबईत घेऊन आलेले गजाननचे वडील डॉक्टरांचे हे शब्द ऐकून कोलमडून पडले. त्यांचा मित्र ही पैश्याची व्यवस्था करायला औरंगाबादला गेला होता. या मुंबई नावाच्या भुलभुलैया मध्ये कुठे रक्त शोधायचे हा मोठा प्रश्न गजाननच्या वडिलांना पडला होता. त्या काळजीने ते दिवसभर बाहेर फिरत होते. पण काय आणि कुठे जायचे हेच माहीत नसल्याने पुन्हा हॉस्पिटलला आले तेव्हा हुंदके देतच लॉबीमध्ये बसले. आई आणि पप्पांनी हे पाहिले आणि त्यांना विचारले? "काका काय झाले. का रडताय?" गजाननचे वडील एकच वाक्य म्हणाले, "पोराला दोन पिशव्या रक्त पाहिजे". त्यांचे वाक्य संपते ना तोच आई खाली हॉस्पिटच्या ब्लड बँकेमध्ये गेली आणि त्यांना सांगितले की, "ICU मध्ये असणाऱ्या राहुल नावाच्या पेशंटच्या नावावर जे रक्त आहे त्यातले दोन गजानन नावाच्या पेशंटला द्या" आईचे वाक्य ऐकून ब्लड बँक मधला स्टाफ ही अचंबित झाला. ती माणसं आजही आठवणीने सांगतात की, "तुझ्या आईने त्यावेळी तुझा विचार न करता त्या पेशंटला तुझ्या नावाचे ब्लड दिले होते". खरतरं आईला माहीत होते मी कमवलेले मित्र मला रक्ताची कमी पडू देणार नाही. १०० बॉटल रक्त मित्रांनी माझ्या दोस्तीवर हॉस्पिटलने दिलेल्या तीन महिन्याची वाट न पाहता २३ दिवसात हॉस्पिटलला रिटर्न केले होते.
आईने ब्लड बँकेत सांगून पुन्हा ती ICU च्या लॉबीमध्ये आली. गजाननचे वडील डोक्याला हात लावून बसले होते. आईने त्यांच्या जवळ जात खांद्यावर हात ठेवून सांगितले, "काका रडू नका. झाली रक्ताची व्यवस्था. थोड्या वेळात गजाननला मिळेल रक्त". त्यांना ऐकून काही कळेनाच. त्यांनी त्यांच्या सदऱ्याच्या बंडीत हात घालून पाचशे रुपयाची नोट काढून आई समोर धरली. आई म्हणाली, "पैश्यापेक्षा माणसे मोठी नसतात काका? राहू द्या तुमच्या जवळ". काही दिवसाने जेव्हा गजाननला दिलेले रक्त माझ्या नावाचे होते हे त्याच्या वडिलांना कळाले तेव्हा ते पप्पांच्या गळ्यात पडून रडले होते.
पुढे गजानन पूर्ण बरा झाला. घरी जाताना मला ICU मध्ये भेटायला आला होता. त्याच्या दोन्ही डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. पण त्या पट्टीच्या पलीकडे त्याच्या डोळ्यात असलेला त्याचा 'बाप' मला स्पष्ट दिसत होता.
आठ वर्ष झाली हे सगळं घडून. पण आजही गजाननचे बांधलेले डोळे आणि आणि त्याच्या वडिलांचे उघडे डोळे आठवतात.
गेल्या काही महिन्या पूर्वी माझ्या आईच्या डोळ्यांच्या नसाही फुगल्या होत्या. आणि विशेष म्हणजे सर्जरी न करता औषधाने त्या ठीक झाल्या. कदाचित गजाननसाठी त्याच्या वडिलांसाठी तिने केलेल्या मायपणाची ती पुण्याई असावी.
माझ्या गेल्या वर्षीच्या वाढदिवसा निमित्त मी नेत्रदानाचा फॉर्म भरताना गजानन लख्ख आठवला होता. आणि काही वर्षाने माझ्यामुळे कोण्यातरी गजाननला त्याचा बाप पुन्हा पाहता येईल इतकेच वाटले होते. कदाचित जेव्हा जेव्हा गजाननचे वडील मेथीची भाजी आणि भाकरी खात असतील त्या वेळी त्यांनाही माझे आई पप्पा आठवत असावेत.
कधी कधी उगाच वाटतं राहते पांढऱ्या पट्टीतल्या गजाननच्या डोळ्यांवर आता रे बॅनचा चष्मा लावलेला त्याच्या वडिलांसोबत फोटो असेल त्याच्या फेसबूक डीपी वर.
आई पप्पांनी शिकवलेला या अश्या अनेक माणूसपणाच्या गोष्टी मला आणि भाऊ रोहितला कधी हरू देत नाहीत. त्यांनी जिंकायला आम्हाला कधीच शिकवले नाही, पण लढायला मात्र शिकवले. आणि गजानन हा त्यांच्या शिकवणीतला आम्ही शिकलेलो एक अध्याय आहे.
- राहुल सिद्धार्थ साळवे
वाशी, नवी मुंबई

सोमवार, ५ नोव्हेंबर, २०१८

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग ६

 दुःख तेव्हाचं सुगंधी होते,

जेव्हा तुम्हाला भेटणारी माणसे गुलाबी असतात.
ती ही अशीच भेटली होती. हॉस्पिटलमध्ये तिच्या माझ्या बेड मध्ये असणाऱ्या एका पडद्याच्या पलीकडे.
ती भेटली तेव्हा तिचं वय २७ वैगरे असेल. आणि माझं २९.
किती भारी असते ना? एखादा असा क्षण असतो की सर्वसामान्य लोकांना अवघडल्या सारखा वाटतो तो. आणि तोच क्षण आपल्याला एक अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात देतो की पुढे त्या व्यक्तीच्या सहवासाने आपले दुःख सुगंधी होते.
एका नामांकित कंपनीत ती मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. एक दिवस लंच टाईम मध्ये जेवून ऑफिस बाहेर शतपावली करत असताना चक्कर आली. कंपनीच्या पॅनल डॉक्टरने ताबडतोब तिला ऍडमिट केले. बऱ्याच टेस्ट वैगरे करून घेतल्या. आणि अखेर हातात पडलेल्या रिपोर्ट मध्ये ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला.
मला भेटली तेव्हा जवळपास तिचे पाच केमो झाले होते. थोडे फार केस गेले होते. डोळे खालावले होते. गोरीपान असलेली ती एखाद्या सुकलेल्या सफरचंदा सारखी दिसत होती.
माझ्या अगदी बाजूच्या बेडवर ती आधीच ऍडमिट होती. मी संध्याकाळी ५ च्या दरम्यान ऍडमिट झालो असेल. आणि रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तिच्या बेडच्या बाजूने काहीतरी कुजबुज ऐकू आली, "आई युरिन पास करायची आहे. पण बाजूला एक मुलगा ऍडमिट झालाय." हे वाक्य माझ्या कानावर पडले. खूप वाईट वाटले. दुःखातही माणसे आपला स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करत असतात. पण खरं तर काही पर्याय नव्हता. तिची आई म्हणाली, "हो गं ! पण काय करू. दुसरा कुठे बेड ही रिकामा नाही." हे सारे ऐकून माझ्या आत खोल पोटात कंठ दाटल्या सारखा झाला. काय करावे काही कळेना. मी मुद्दामच माझ्या बाजूला बसलेल्या माझ्या भावाला म्हणालो, "झोपतो रे. खूप पाठ आणि पाय दुखतोय. लाईट बंद कर." त्याने लाईट बंद केली. आणि माझ्या बेडचा पडदा बंद करून जेवायला गेला. मी भावाला बोललेले वाक्य त्याच्यासाठी नाही तर बाजूला ऍडमिट असणाऱ्या तिच्या साठी होती. लाईट बंद करताच. पाच मिनिटाने हळूच आवाज आला, "आई झोपला वाटतं तो मुलगा. दे लवकर बेडपॅन" आणि मी घट्ट कानात बोटं घालून डोळे मिटून पडून राहिलो.
१५ मिनिटाने भाऊ जेवून आला. तो पर्यंत मला डोळा लागला होता. त्याने कानातली माझी बोटं काढण्याचा प्रयत्न केला नि मला जाग आली. पुढे ती पूर्ण रात्र मी झोपलो नाही. माझ्या डोक्यात तिचे वाक्य गरगर फिरत होते. आणि उघड्या डोळ्यांनीच सकाळ झाली.
सकाळी ७ वाजता सिस्टर ने स्पंज दे विचारले, "आता कश्यासाठी रे परत ऍडमिट झालास एकच महिना झाला ना घरी जाऊन?" मी उगाच थोड्या मोठ्या आवाजात सांगितले सिस्टरला, "सिव्हीअर युरिन इन्फेक्शन झाले आहे. ब्लॅडर ब्लॉक झालाय कदाचित." ऐकून सिस्टर ही म्हणाली, "कधी संपणार रे हे तुझ्या मागचं सगळं देव जाणे." मी हसलो फक्त.
सकाळचे १० वाजत आले होते. माझ्या डोक्यात फक्त नि फक्त तिचे कालचे वाक्य फिरत होते. मला मोकळे व्हायचे होते. कारण माझ्यामुळे तिने कोंडून जाऊ नये इतकेचं मला वाटतं होते आणि मी कसला ही विचार न करता पडद्यावर हात मारत तिला आवाज दिला,
"excuse me! जरा तुमच्याशी बोलायचे आहे. थोडा कर्टन बाजूला करू का?".
ती : "any problem?".
मी : "नाही मोबाईलचा चार्जर हवा होता. मी विसरलो।घरी".
ती (पडदा खोलत ) : हे घ्या !
मी : सॉरी !
ती : का?
मी : काल माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. माझ्या कानावर तुमचे वाक्य पडले.
ती : म्हणजे ?
....आणि मी कसला ही विचार न करता काल जे काही घडले - झाले भाडभाड तिच्या समोर मांडले. ती बघतच राहिली माझ्याकडे. मी बोलता बोलता म्हणालो, "मला कळतंय एक तरुण मुलगा आपल्या बाजूला ऍडमिट असताना मनात काय येत असेल ते. पण मी ही इथे दुःख - वेदनाचं घेऊन आलोय. पण माझ्यामुळे तुम्हाला अडचण न व्हावी इतकेचं वाटते. तुम्ही कसलाच संकोच बाळगू नका". आणि मी हातात धरलेला मोबाईल चार्जर पुन्हा तिला देत म्हणालो, "Thank you". आणि कर्टन लावून घेतला. नंतर मला कळले की, मी बोलल्या नंतर त्या दिवशी ती रडली होती.
पुढे आमच्यात बंद पडद्या आडून गुड मॉर्निंग - गुड नाईट असे छोटे छोटे संवाद होऊ लागले. माझी आई तिच्या बेडकडे जाऊन तासंन तास तिच्या सोबत गप्पा मारायची. आमच्यातले छोटे संवाद पुढे मैत्रीत रूपांतर झाले. पडदा खोलून आम्ही गप्पा मारायचो. जास्त करून विषय चित्रपट वैगरे असायचे.
सगळं बोलणे वैगरे छान सुरू होते. तिची आणि आईची मस्त ट्युनिंग जमली होती. आई घरून येताना तिला केक - कॅडबरी घेऊन यायची. आणि अश्यातचं मला डिस्चार्ज मिळाला. जाताना आईने माझा आणि आईचा नंबर तिला लिहून दिला. आणि मी घरी आलो.
पुढे तीन वर्ष तिची माझी कधीच भेट झाली नाही. अनेक वेळा ती आणि मी एकाच वेळी पण वेगवेगळ्या वॉर्ड मध्ये ऍडमिट असायचो. मला जाऊन तिला भेटणे शक्य नव्हते. आणि केमो मुळे ती इतकी थकली होती की तिलाही येऊन मला भेटता येत नव्हते. पण तिने ज्या काही सकारात्मकतेने सगळे सोसले होते ते कमालीचे होते. तिच्या जिद्दीवर आकाशवाणीने एक एपिसोडही केला होता. कितीही त्रास होऊ दे ती कधीच नकारात्मक झाली नाही.
मधल्या तीन वर्षांच्या काळात आम्ही फोनवर - मॅसेजवर खूप बोललो. स्वतः ची मन मोकळी केली. कदाचित आम्ही दोघेही अशी ओंजळ शोधत होतो की, जी आम्हाला सांडू देईल. मला ती ओंजळ तिच्यात दिसली. कदाचित तिला ती माझ्यात दिसली असेल.
मोबाईलवर गाण्यांच्या भेंड्या खेळायचो. आवडलेली कविता बोलून दाखवायचो. गॉसिप वैगरे वर गप्पा मारायचो. मी आपला उगाच कधीतरी तिला म्हणायचो, "इतकं नको बोलत जाऊ रे मी चुकून तुझ्या प्रेमात पडले." ती हसायची आणि म्हणायची, "इतकी वेडी नाही मी तुझ्या सारख्या टुकार माणसाला प्रेमात पडू देण्या इतपत."
तिची माझी पहिली भेट होऊन तीन वर्ष झाली होती. ती आणि मी एकत्र पण वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ऍडमिट झालो होतो. पुढे दहा दिवसाने तिची तब्येत खूप खालावली. इतकी खालावली की तिचे माझे बोलणे बंद झाले. आई तिला भेटून आली की सांगायची, "थकली रे आता ती खूप". खूप सहन करत करत तिने मागचा तीन वर्षाचा काळ काढला होता. पण आता डॉक्टरही म्हणाले होते की, "घरी घेऊन जा. शक्य नाही आता अजून काही करणे." आणि तिला घरी घेऊन जायचे ठरले.
खूप खालावली होती ती शेवटच्या काळात. अंगातली ताकद पूर्ण संपली होती. डोळे खूप खोल गेले होते. सफरचंदा सारखा असलेला तिचा चेहरा आता काळा सावळा पडला होता. डोक्यावर एकही केस राहिला नव्हता. तिच्या घरी जायचा दिवस उजाडला आणि तिने हट्ट केला. की, घरी जाता जाता राहुल ला भेटूनच जायचे.
तासा भराने व्हीलचेअर वर बसून ती माझ्या बेडजवळ आली. तिला पाहून जोर जोरात रडावे वाटले. तिच्याही डोळ्यात पाणी जमा झाले होते. तीन वर्ष एक सुंदर नातं आम्ही जपले होते. जाता जाता माझ्या हातावर हात ठेवत म्हणाली, "चल जाते." मी म्हणालो, "काळजी घे ! भेटू लवकरचं पुन्हा". ती हळूचं म्हणाली, "शक्य नाही. तुझी आठवण येईल. जमल्यास फोन कर". मी हो म्हणालो. आणि bye बोलून ती घरी जायला निघाली.
घरी पोहचली तेव्हा तिचा मॅसेज आला होता, "reached". पुढे दोन दिवस काही बोलणे नाही झाले. आणि तिसऱ्या दिवशी दुपारी सिस्टरने मला येऊन सांगितले की, ती गेली. कायमची. तिच्या आठवणी मला देऊन आणि माझ्या सोबत घेऊन.
चार वर्षाचा काळ लोटलाय तिला जाऊन. पण तिचा आवाज आजही कानात स्पष्ट पणे ऐकू येतो. तिचा प्रवास आठवतो. तिने दाखवलेले फोटो आठवतात. तिचे जगणे - झिजणे आठवते. फक्त ती आठवत नाही. ती आठवायला मी तिला विसरलो नाही. विसरणार नाही. तिच्या मैत्रीने मला खूप काही शिकवले. खूप काही जाणवून दिले. आणि एक ओळ माझ्या मनावर कायमची कोरून ती निघून गेली की, तुम्हाला भेटणारी माणसे गुलाबी असतील तर तुमचे दुःख सुगंधी होते. तुमचे दुःख सुगंधी होते.
प्रत्येकाच्या वाट्याला अशी गुलाबी माणसे येवोत इतकेच यानिमित्ताने !
मला कधी कधी वाटत राहते तिचा मोबाईल नंबर बदलला तर नसेल ना?
- राहुल सिद्धार्थ साळवे
वाशी, नवी मुंबई

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग १०

प्रांजल. वय वर्ष सात वैगरे असेल तिचे. अगदी नाजूक पोरं. भारता बाहेर आपल्या आई वडिलांसोबत राहणारी भारतीय मुलगी आणि तिची बहीण. म्हणजे एकंदरीत ए...