कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका लहान खेडे गावातून आजी आपल्या सरकारांना घेऊन मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटल आली होती. सरकार? आजी तिच्या नवऱ्याला सरकार म्हणायची.
जीवाची मुंबई करत जगणारी माणसे पाहत आलोय आपण. पण आपल्या सरकारांचा जीव वाचवायला आजीने मुंबई गाठली होती.
बापाच्या वशील्यावर दोन्ही पोरांना सरकारी नोकरी लागली आणि पोरांना शिंग फुटली. आयुष्यभर बापाने हृदयासारखी जपलेली पोरं, बापाच्या बायपासच्या ऑपरेशनला साधी फिरकली ही नाही. पण आजी म्हणायची, "लेकरं मोठी झाली पण त्याबरोबर ती खोटी देखील झाली.
माझ्या बाजूच्या बेडवर आजोबा ऍडमिट होते. साधारण सत्तर च्या जवळपास असेल आजोबांचे वय. ह्रदयात ९०% ब्लॉकेज होते. त्यात शुगर - ब्लडप्रेशरचा त्रास होता. कोल्हापुरातल्या डॉक्टरांनी त्यांना बायपास करावे लागेल सांगितले होते. पण या वयात ऑपरेशन करणे धोक्याचे आहे हे ही सांगितले होते. पण सरकारांची आशा काळे मागे हटली नाही. तिने तिच्या सरकारांना घेऊन थेट मुंबई गाठली. आणि तीही अश्या डॉक्टरकडे की, ज्यांची अँपॉईंमेंट मिळण्यासाठी दोन दोन महिने वाट पहावी लागायची. मला प्रश्न पडला होता की, आजी स्वतः च्या जीवावर आजोबाला कशी काय इथपर्यंत घेऊन आली असेल.? म्हणून न राहवता एक दिवस आजीला विचारले मी, "आजी इतक्या मोठ्या हॉस्पिटलला घेऊन येताना भिती नाही वाटली का?. आजी हसत म्हणाली, "लेकरा जिवापेक्षा जमीन मोठी नसते. सरकार सोबत राहिले तर लय जमिनी कमवू." मला कळले होते आजीने जमीन विकून आजोबांना उपचारासाठी मुंबईत आणले होते.
पूर्ण हॉस्पिटल वातानुकूलित होते. आजोबांना हॉस्पिटल कडून ब्लॅंकेट दिले होते. आणि अजून लागले तरी त्यांना ते मिळायचे. पण आजी मात्र थंडीने काकडून जायची. माझ्या जीवाला हे सारं खातं राहायचं.
एक दिवस आईला सांगितले की, येताना आपल्या घरचे एक ब्लॅंकेट घेऊन ये. तिला काही कळले नाही. ती म्हणाली, "सिस्टरला माग ना देतील त्या". मी म्हणालो, "घेऊन तर ये".
दुसऱ्या दिवशी आई ब्लँकेट घेऊन हॉस्पिटलला आली. मी आजींना आवाज दिला. आणि ब्लॅंकेट देत त्यांना म्हणालो, "हे घ्या ! थंडीचं असं काकडून नका झोपत जाऊ". आजी होती ती. तिच्या सरकारांची. आधी नाही नाहीच म्हणाली. मी म्हणालो, "राहू द्या ठेवा. मुलगा समजून ठेवा." आजी ऐकताच एकच वाक्य म्हणाली, "तुझे माय बाप कधी म्हातारं नाय व्हायचे बघ." आजीच्या शब्दाने माझ्या अंगावर काटा आला. आईकडे बघत म्हणत म्हणालो, "ही काय माझी माय इथेच बसली आहे". आजीने आईकडे बघत तिच्या डोक्यावर हात ठेवत आजोबांच्या बेडकडे निघून गेली. त्या दिवसा नंतर आजीच्या दातांचा आवाज कधीच आला नाही. माझ्यासाठी तो थांबलेला आवाज म्हणजे आजीला दिलेली एक उब होती.
दोन दिवसा नंतर आजोबांच्या ऑपरेशनचा दिवस आला. दुपारी एक वाजता आजोबांची बायपास सर्जरी होणार होती. त्या रात्री आजी रात्रभर वॉर्ड मध्ये फेऱ्या मारत होती. साहजिक होते. तिच्या सरकारच्या ह्रदयाला हात घातला जाणार होता. कदाचित तिच्या मनात, तिच्या सरकारांचे ह्रदय खोलता आपली नालायक पोरं न दिसावी असं काहीसे असेल का? असे मला वाटतं होते. त्या रात्री मला सौमित्रची बायपास नावाची कविता नव्याने भेटली होती.
सकाळ होताच आजोबांच्या ऑपरेशनची तयारी सुरू झाली. सिस्टरची लगबग चालू होती. बार्बर मित्रांनी आजोबांची पूर्ण शरीराची शेविंग ही करून घेतली होती. आजोबांच्या हातात खंडोबाचा एक धागा बांधलेला होता. सिस्टर म्हणाली तो काढावा लागेल. पण आजोबा म्हणाले ,"नाय काढता यायचा. माझा देव हाय तो." खूप विनवणी केली तरी आजोबा ऐकायला तयार नव्हते. शेवटी मी आजोबांना म्हणालो, "बाबा ! तो धागा काढून आजीकडे द्या. ऑपरेशन झाले की पुन्हा घाला". पण आजोबा काही ऐकायला तयार नव्हते. काय करावे कोणालाच कळत नव्हते. आणि शेवटी मी माझी साहित्यिक भाषा वैगरे कामी येते की नाही हे पाहायला पुन्हा आजोबांना म्हणालो, "बाबा ! एक म्हाळसा आपल्या खंडोबाला कोल्हापूर वरून घेऊन आली आहे. आणि तिचा देव कोण कसा चोरेल?". आजोबाच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी सांगितले, "काढा धागा पण माझ्या यांच्या कडे द्या."
सात तासाच्या सर्जरी नंतर आजोबांना ICU वॉर्ड मध्ये शिफ्ट केले. माझी आणि आजी आजोबांची भेट होणार नव्हती आता. पण मनात एकचं विचार होता, "माझी घोंगडी पांघरणार्या म्हाळसेचा खंडोबा सुखरूप रहावा".
पुढे पाच दिवस गेले. माझेही रक्तातले क्रियेटिन हळू हळू कमी होतं होते. आणि एकदिवस हेड सिस्टर आली आणि म्हणाली, "राहुल तेरे बाजू में वो अंकल थे ना उनको अभी जनरल वॉर्ड में शिफ्ट करना है. वो फिरसे तेरे बाजू में ही आने के लिए बोल रहे है. लेकीन इस वॉर्ड में बेड नही है. मम्मी को बोलके उनसे बात करने बोल." मला तर आधी काही कळले नाही. आजोबा माझ्या बाजूलाच परत यायचे म्हणून अडून बसले होते. आईने ही आजीला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. काय करावे हा प्रश्न असताना माझ्या समोरच्या बेडवर एक मुलगा ऍडमिट होता. २५ वर्षाचा असेल. मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी आला होता. त्याचे वडील हे सगळं पाहत - ऐकत होते. आणि त्यांनी सिस्टरला जाऊन सांगितले की, आजोबांना त्यांच्या मुलाच्या बेडवर शिफ्ट करा आणि त्यांच्या मुलाला आजोबांच्या बेडवर. सिस्टर ने हे मला जेव्हा येऊन सांगितले तेव्हा मला माझे वडील आठवले. बाप बाप असतो. मी त्या मुलाच्या वडिलांना THANK YOU म्हणालो. ते फक्त हसले. पुढे काहीच म्हणाले नाही. पण मी मात्र मनात म्हणालो, "अंकल तुम्ही कधी म्हातारे होणार नाही."
पुढे एक तासात सगळी बेडची आदला बदल झाली. आणि माझ्या समोरच्या बेडवर आजोबा शिफ्ट झाले. आजोबा शिफ्ट होताच आजी माझ्या जवळ येऊन म्हणाली, "सरकारांना तुझ्या जवळच परत यायचे होते." आजोबांनी आजीचे ते शब्द ऐकले आणि म्हणाले, "सरकार नाय खंडोबा म्हण खंडोबा". आणि वॉर्ड मध्ये हशा पिकला.
पुढे आठ दिवस मला त्या आजी आजोबांचा सहवास लाभला. गावच्या गोष्टींनी दिवस मातीमय व्हायचा. आजोबांच्या पैलवानीच्या आठवणीने वॉर्डचा तालीम रंगायचा. मध्ये मध्ये त्यांच्या पोरांचा विषय निघाला की, आजोबा शिव्याच द्यायचे.
असच चालू असताना मला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे, हे आजीला कळले. तिने आजोबांना सांगितले. आजोबा इतकेच म्हणाले, "उद्या जाणार व्हय लेकरा घरी". मी हो म्हणालो. ते म्हणाले, "लक्षात ठेव आम्हासनी. कोल्हापुरात आलास तरी घरी ये. बोकड्याचा बेत करू". मी फक्त हसत होतो ऐकून. पण बोलताना आजोबांचा स्वर हळवा होत चालला होता. मी माझा मोबाईल नंबर एका कागदावर लिहून त्यांना दिला. म्हणालो घरी गेलात की फोन करा.
सकाळ झाली. माझ्या घरी जाण्याची तयारी सुरू होती. आणि स्टीवर्ड कॅनटिंग मधून मला चहा आणि एक मारी बिस्कीटचा पुडा घेऊन आला. मी म्हणालो, " " अरे मी नाही ऑर्डर केले काही. चुकून माझा बेड नंबर ऐकला असेल." आणि तितक्यात आजी म्हणाली, "आमच्यात लेकराला चहा नाय पाजत पण इथं तुला काही गोड धोड ही बनवून नाय देऊ शकत." मी सुन्न झालो. आजी आजोबांनी माझ्यासाठी सिस्टरला सांगून त्यांच्या बिलात पैसे ऍड करून मला चहा आणि बिस्कीट पाठवायला सांगितले होते.
तो चहा आणि बिस्कीट खात असताना माझा गळा दाटला होता. पण रडू शकणार नव्हतो. मी रडलो असतो तर आजी आजोबा रडले असते हे मला माहित होते. मला त्यांना रडवायचे नव्हते.
माझी घरी निघण्याची तयारी झाली. हॉस्पिटलचे कपडे बदलून मी घरचे कपडे घातले. व्हीलचेअर वर बसलो. आणि आजोबांकडे जाऊन त्यांना म्हणालो, "खंडोबा बाबा येतो". आजोबा खूप जोरात हसले. माझा हुंदका फुटण्या आधी मी वॉर्डच्या बाहेर पडलो. आजी माझ्या व्हीलचेअर च्या मागून मला सोडायला लिफ्ट पर्यंत आली होती. पण तिला मागे वळून पाहण्याची माझी हिंमत झाली नाही.आणि मी बघता बघता हॉस्पिटलच्या बाहेर पडलो.
दोन वर्षांचा काळ लोटला या साऱ्याला. आजी आजोबा आजही आठवतात. खंडोबाचा फोटो पाहण्यात जरी आला तरी मला आजोबा आठवतात. मी दिलेला मोबाईल नंबर कदाचित त्यांच्या कडून हरवला असेल. पण मी दिलेले ब्लॅंकेट घेऊन आजही आजी सुखाने झोपत असेल असे वाटत राहते.
किती साधी असतात ही मातीतली माणसे. आपणचं का इतका आव आणून जगत असतो? प्रत्येकाच्या हृदयात आपली आपली माणसे असतात. कदाचित ऑपरेशन आधी आजोबांनी डॉक्टरला सांगितले असेल का? की, "मला त्यांच्या ह्रदयात ठेवून मग टाके घालायला.?" सौमित्रची बायपास कविता या अश्या माणसांच्या हृदयातून जिवंत आहे. आणि पुढेही असेल.
आपण फक्त ज्याचा त्याचा खंडोबा ज्याला त्याला दाखवून दिला पाहिजे. बाकी मग सारे आयुष्यचं चांगभलं आहे. चांगभलं आहे.
- राहुल सिद्धार्थ साळवे
वाशी, नवी मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा