रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग १

२०१२ चा मे महिना होता. मी ब्लॅडरच्या सर्जरीसाठी ऍडमिट झालो होतो. माझे सगळे सोपस्कार पार पाडून काटछाट करून टाके बिके मारून दोन दिवस झाले होते. मी आपला कमंडल सारखी युरिन बॅग संभाळत पडलो होतो बेडवर भर उन्हाळ्यात मस्त AC चा आनंद घेत.

माझ्या समोरच्या बेडवर एक २०-२१ वर्षाचा तरुण मुलगा ऍडमिट झाला होता. त्याच्या पायाची सर्जरी होणार होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका लहान खेड्यागावातून तो आणि त्याची आई आली होती. आईकडे पाहूनच मला कळले होते की दुष्काळी भागातून असल्याने भयाण मोलमजुरी करून तिने तिच्या लेकराला उपचारासाठी मुंबईत आणले होते. काय ताकद असते यार आई मध्ये ? लेकराला बरे करण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून मोलमजुरी करत तिने ३ लाख जमा केले होते. आणि मुंबई गाठली होती.
पुढे दोन दिवसाने त्याचीही सर्जरी झाली. त्यारात्री पोरगा भयाण ओरडत होता. मला ती वेदना माहीत होती. कळत होती. पण पर्याय नव्हता त्याला ते सहन करण्यापलीकडे. त्याच्या आईच्या डोळ्यात अख्खच्या अख्ख आभाळ उतरले होते. पण ती काही रडली नाही. मला त्या क्षणाला कळले की, बापाविना पोरं आहे आणि आई 'बाप' झाली आहे.
दोन - तीन दिवस गेले. पोरगा हळू हळू सावरत होता. माझाही युरिन बॅग रुपी कमंडल काढला होता. पण गेल्या ५ दिवस मला एक गोष्ट खात होती. त्याची आई गेल्या ५-६ दिवसात एकदाही त्याला सोडून बाहेर गेली नव्हती. गेली असेल तरी पाच - दहा मिनिटात लगेच यायची. आणि प्रत्येकवेळी पेशंटला जेवण आले की त्या माय लेका मध्ये काहीतरी कुजबुज व्हायची.
अजून दोन दिवस गेले. मग मला राहवले नाही. मी त्या आईला विचारलेचं, "मावशी तुम्ही कुठे जेवता?मी दहा दिवस पाहतोय तुम्ही याला सोडून कुठेच जात नाही". शेवटी माय ती. ती म्हणाली, "लेकराला असं टाकून कुठं जाऊ जेवाया? घासतरी उतरलं का घश्याखाली? आणि एका वेळचं जेवाया १०० रुपयं घालवून बसले तर याला घरी कस काय घेऊन जाऊ?"
माझं तर अंग थरथरले एका आईचे शब्द ऐकून. मला माझी आई आठवली. २०१० ते २०११ चा तो भयाण काळ माझ्या आईसाठीही इतकाचं डेंजर होता.
खरतरं, त्या आईचे शब्द ऐकून मी अस्वस्थ झालो. ती रात्र जागून काढली. गेल्या दहा दिवस ती आई फक्त पाण्यावर होती. कधीतरी लेकराला येणाऱ्या हॉस्पिटल च्या जेवणातून एखादं दुसरा घास खात असेल तोच काय तिच्या जीवाला आधार. त्याच रात्री ठरवले काही होऊ दे, जो पर्यंत हॉस्पिटल मध्ये मी ऍडमिट आहे तो पर्यंत या आईला उपाशी राहू देणार नाही.
दुसरा दिवस उजाडला. माझे डॉक्टर मला भेटायला आले. सगळं ठीक आहे म्हणाले. अजून थोडे दिवस थांब मग डिस्चार्ज देतो म्हणाले. पण माझ्या डोक्यात वेगळचं काहीतरी सुरू होते. त्या आईला कसे जेवण मिळेल याचाचं विचार माझ्या डोक्यात फिरत होता. आणि मी डॉक्टरांना म्हणालो, "सर हॉस्पिटल च्या जेवणाने माझे पोट भरत नाही आणि दरवेळी तेच खाऊन कंटाळा आला आहे."
माझ्या आई वडिलां नंतर माझ्यावर जीवापाड आणि निस्वार्थी प्रेम कोणी केले असेल तर ते हॉस्पिटल मधले डॉक्टर आहेत. ते लगेच म्हणाले "बाहेरून तर काही आणता येणार नाही पण मी सिस्टरला सांगतो की डायटीशिअनला सांगून तुला जास्त जेवण द्यायला". आणि त्या दिवसा पासून पुढचे दहा दिवस मला दोन प्लेट जेवण येऊ लागले.
दुपार झाली. पेशंटचं लंच आले. ठरल्या प्रमाणे मला दोन प्लेट आल्या. माझी आई बाजूलाच बसली होती. ती म्हणाली, "दोन कशाला रे? मी बाहेर जाऊन खाईल. उगाचं कशाला वाया घालवतो जेवण?" मी तिला इशाऱ्याने सांगितले की समोरच्या टेबल वर एक प्लेट ठेव.
प्लेट ठेवताच मी जोरात समोर आवाज दिला, "मावशी जेवण आले आहे घ्या". ती म्हणाली, 'आलयं की आम्हाला, एवढं खातोय व्हय हा. एक बस हाय."
मी म्हणालो, "त्याला नाही तुम्हाला आले आहे." त्यांनी पडदा खोलत माझ्याकडे पाहिले. ताट आत घेतले. आणि पुन्हा पडदा लावला. पुढचे दहा दिवस असेच सुरू राहिले. मला भयाण आनंद झाला होता. एका मायसाठी आपण काहीतरी करू शकलो याचा.
आज त्या आईच्या लेकराला डिस्चार्ज मिळणार होता. उस्मानाबाद वरून अंबुलन्स मधून स्ट्रेचरवर आणलेल्या आपल्या पोराला बरं करून ती त्याला आज उभं करून ट्रेनने आपल्या गावी जाणार होती. मला तर नाचू वाटतं होते. त्यांची जाण्याची लगबग सुरू झाली. डिस्चार्ज पेपरवर अंगठे शेवटी त्यांची निघायची वेळ आली.
ती आई माझ्या जवळ आली. मळकटलेल्या पाकिटातून दोन चुरगळलेल्या पन्नासच्या नोटा काढल्या आणि हे धर बाळा घरी गेलास की काहीतरी खाऊ खा म्हणाली. ऐकून माझा तर गळाचं दाटला. शब्दच फुटेना माझ्या तोंडातून. मी फक्त बघत राहिलो. ती आणि तिचा लेक भरल्या डोळ्याने मला शेवटचा हात दाखवत वॉर्डच्या बाहेर पडले. मी काही मिनिटं स्तब्ध झालो होतो. आणि हातातल्या चूरगळलेल्या नोटांचा वास घेतला. त्यांना त्या आईच्या स्वाभिमानाचा गंध होता. मी तिला मनातून सलाम ठोकला. आणि हातातल्या नोटा कवितेच्या डायरीत ठेवल्या.
मला आजही जेवताना शिंक आली की वाटते, त्या मायने माझी आठवण काढली असावी. तिचा मुलगाही आता मोठा झाला असेल. नोकरीला वैगरेही असेल. बाकी काही नाही त्यालाही कोण्या तरी आईने आशीर्वादाच्या दोन चुरगळलेल्या पन्नासच्या नोटा द्याव्यात इतकेच वाटते. इतकेच वाटते.

मी : हॉस्पिटल आणि माणूस - भाग १०

प्रांजल. वय वर्ष सात वैगरे असेल तिचे. अगदी नाजूक पोरं. भारता बाहेर आपल्या आई वडिलांसोबत राहणारी भारतीय मुलगी आणि तिची बहीण. म्हणजे एकंदरीत ए...